- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, सरकारने २९,९९२ क्वारंटाईन बेड तयार केले आहेत, तर ४६,५९,०६३ एवढे ट्रीपल लेअर मास्क तयार ठेवले आहेत. ज्या पीपीई किटवरून सध्या राज्यभरात ओरड सुरु आहे ते देखील भरपूर आहेत, पण त्यातील कोणती वस्तू कोठे वापरायची यावरून संभ्रम निर्माण झाल्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. त्यासाठी गेले दोन तीन दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
कोरोनाचे रुग्ण ज्या वॉर्डात आहेत तेथे किंवा आयसीयूमध्येच जाताना जो पूर्ण बंदिस्त सूट वापरला जातो त्याला ‘हजमत सूट’ म्हणतात. जो मास्क घातला जातो त्याला ‘एन ९५ मास्क’ म्हणतात. हा मास्क अॅडमिट झालेल्या रुग्णांना तपासतानाही वापरला जातो. जेथे तापाचे रुग्ण नाहीत, तेथे थ्री लेअर मास्क वापरण्याचे सल्ले देण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या गाईड लाईन केंद्राने सगळ्या देशात दिल्या आहेत, असेही डॉ. लहाने म्हणाले.
व्हेंटिलेटरदेखील आपल्याकडे आजच्या रुग्णांसाठी भरपूर आहेत असे सांगून ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या १८ वैद्यकीय शिक्षण विभागात २२२ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ११४३ व्हेंटिलेटर्स आहेत. त्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जे हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य विभागाला जोडले गेले आहेत त्यांच्याकडे १,६९८ व्हेंटिलेटर्स आहेत.
जेव्हापासून कोरोनाचे रुग्ण येत आहेत तेव्हापासून मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात २०, तर पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये १० व्हेंटिलेटर्स चालू आहेत. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरून १०० रुग्णांमागे ६ रुग्णांना व्हेंटिलेटर लागत आहे. आपल्याकडे ३,०६३ व्हेंटिलेटर्स आहेत. त्यामुळे ते पुरेसे आहेत.
पीपीई किट कशाला म्हणायचे?
1. ज्यामध्ये थ्री लेअर मास्क, एन ९५ मास्क, एचआयव्ही किट आणि हजमत सूट असतो त्याला पीपीई किट म्हणतात. त्याला पर्सनल प्रोटेक्शन इक्व्यूपमेंट म्हणतात. या चारही वस्तू फक्त कोरोनाच्या रुग्णास ज्या ठिकाणी ठेवले आहे तेथेच वापरल्या जातात. मात्र, सगळ्यांनाच पीपीई किट मागणे चुकीचे आहे, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.
2. थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्या ठिकाणी आहेत तेथेच वापरला जाणारा हजमत सूटचे टेंडर मुंबई महापालिकेने केले आहे. त्याच्याच आधारे ज्यांना याची गरज लागेल त्यांनी ते घ्यावेत अशा सूचना राज्यभर देण्यात आल्या आहेत.
3. सध्या हे हजमत सूट रोज ३०० च्या आसपास लागत आहेत, ज्यांना याची आॅर्डर दिलेली आहे ते रोज १००० सूट बनवत आहेत. आज परिस्थिती नियंत्रणात आहे, पण रुग्ण वाढले तर मात्र याची गरज वाढेल, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.