मुंबईत मलेरियाचे ४ हजार, तर लेप्टोचे २६६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:51 AM2019-12-30T01:51:50+5:302019-12-30T01:51:59+5:30
आरोग्य विभागाची माहिती; मलेरियाचा शून्य बळी, तर लेप्टोचे ११ मृत्यू
मुंबई : यंदाच्या वर्षात शहर-उपनगरात पाऊस उशिरापर्यंत असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. यंदा वर्षभरात मुंबईत मलेरियाच्या ४ हजार ११० रुग्णांची, तर लेप्टोच्या २६६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. लेप्टोच्या ११
रुग्णांचा मृत्यू ओढावला, तर मलेरियाचा एकही बळी गेला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. शहर-उपनगरात २०१७ साली ६ बळी आणि ६ हजार १९ रुग्णांची संख्या होती, तर २०१८ साली ३ बळी आणि ५ हजार ५१ रुग्ण होते. २०१० सालापासून मलेरियाच्या शून्य मृत्यू धोरणासाठी पालिकेचा आरोग्य विभाग काम करत आहे. २०१० सालापासून शहर-उपनगरात ८० हजार रुग्ण आणि १४५ मृत्यूंची नोंद आहे. मात्र आता मलेरियाचे प्रमाण ९५ टक्क्यांनी घटले असल्याचे दिसत आहे.
यंदाच्या वर्षभरात लेप्टोची २६६ जणांना लागण झाली, तर ११ मृत्यूंची नोंद झाली. २०१८ साली १२ बळी आणि २१८ रुग्णांची नोंद झाली होती. परतीच्या पावसामुळे लेप्टोच्या ३२ नव्या रुग्णांची नोंद नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली. मागील वर्षी ही संख्या ११ एवढी होती. पावसाळ्यात लेप्टोची समस्या मागील काही वर्षांत गंभीर झाली आहे. त्यात २०१५ साली १६ जुलै या एकाच दिवशी १९ जणांचा लेप्टोने बळी घेतला होता. मागील दोन वर्षांत पालिकेच्या आरोग्य विभागाने लेप्टोवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार केले. तर शहर-उपनगरात घरोघरी जाऊन राबविलेल्या आरोग्य मोहिमा, तपासण्या आणि जनजागृतीमुळे हे प्रमाण घटल्याचे निरीक्षण पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.