लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर, आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्हे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक व्यक्त करत आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन ऑफलाईन प्रत्यक्ष परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या इतर पर्यायांचा विचार निकाल लावण्यासाठी करावा, अशी भूमिका राज्य शिक्षण विभागाने या आधीच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने ज्याप्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल लावण्याचा निर्णय घेतला तसाच बारावीच्या परीक्षांसाठीही पर्यायी मूल्यमापन व्यवस्था करण्याकडे त्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशपातळीवर रद्द करण्यात आल्याने साहजिकच मूल्यांकनासाठी सीबीएसई मंडळाला दहावी परीक्षेप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडावा लागेल. यामुळे जर राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा झाल्या तरी बारावीनंतरच्या प्रवेशांसाठी गुणांकन समांतर पातळीवर राखण्यात अडचणी निर्माण होतील, शिवाय राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव सीबीएसई मंडळाप्रमाणेच परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय राज्य मंडळालाही अपरिहार्यरीत्या स्वीकारावा लागणार असल्याचे मतही अभ्यासकांनी मांडले. यासंदर्भातील निर्णय येत्या एक ते दोन दिवसात अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.......................................................................