संकट आहेत पण...; पवारांनी सांगितली दुष्काळी पट्ट्यात डाळिंब शेती फुलवलेल्या तरुणाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 08:00 AM2023-05-08T08:00:20+5:302023-05-08T08:02:51+5:30
येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने दीड एकर जमिनीची कशारितीने २० एकर फळबाग केली हे पवारांनी सांगितले.
मुंबई/सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकारणी म्हणून देशाला परिचीत आहेत. मात्र, एक कुशल शेतकरी आणि कृषी अभ्यासक म्हणूनही ते शेतकऱ्यांना अतिशय जवळचे वाटतात. शेतीविषयक त्यांचा अभ्यास गाढा आहे, तर जेथे जाईल तेथील शेतीविषयक उत्पादने, जमीन आणि शेतकऱ्यांचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची आवड दिसून येते. म्हणूनच देशाच्या कृषीमंत्रीपदी त्यांनी तब्बल १० वर्षे कारकिर्द सांभाळली. त्यात, अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. शरद पवारांनी सांगोल्यातील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना खचून न जाण्याचा सल्ला दिला. येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने दीड एकर जमिनीची कशारितीने २० एकर फळबाग केली हे पवारांनी सांगितले.
सांगोला येथील जेवीकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रा. लि. ॲग्रीकल्चर रिसर्च व ॲनॅलिटिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या अवकाळी संकटामुळे शेतकरी खचला आहे. मात्र, संकटे असले तरी परिस्थितीवर मात करुन आपण चांगले यश मिळवू शकतो, हे शरद पवार यांनी याच दुष्काळी पट्ट्यातील एका शेतकऱ्याची यशोगाथा समजावत सांगितले. सांगोला या भागातील लोकांचे वैशिष्ट्य आहे की, परिस्थितीवर मात करून नवं काही करायचं, नवी पीकं घ्यायची, इथल्या लोकांची भूमिका आहे. सांगोल्यामध्ये डाळिंबाचे साम्राज्य तुम्ही लोकांनी तयार केले. संपूर्ण देशात येथील माल जातो. चांगला माल म्हणून बघायचा असला की तो सांगोल्याचा म्हणून बघितला जातो. असे अनेक शेतकरी इथे आहेत ज्यांचा परिस्थितीवर मात करून पुढे जायचा निर्धार पक्का असतो. शेजारच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात गेलात तर तिथे आपल्याला हे चित्र बघायला मिळेल, असे म्हणत शरद पवार यांनी दुष्काळी पट्ट्यातील एका प्रगतशील बागायतदाराची यशोगाथाच सांगितली.
चंद्रकांत अहिरकर नावाच्या मुलाला मी त्या भागात भेटलो. त्याने मला त्याची डाळिंबाची बाग दाखवली. डाळिंबाचे वजन ७५० ते ८०० ग्रॅम होते. अतिशय देखणं फळ होतं. त्याची शेती बघायला वाठारजवळ गेलो. दुष्काळी परिसर आहे. वेळ प्रसंगी दुष्काळामुळे पाणी नसेल तर बाहेरुन पाणी आणून झाडं जगवली जातात. माल चांगला आहे. अमेरिका, इंग्लंड, दुबईला जातो. २० वर्षांपूर्वी दीड एकर जागेत डाळिंबाचे उत्पादन घेण्यास त्याने सुरूवात केली. आता २० एकर जागा आहे. आणखी १० एकर जागा आहे तो तयार करत आहे, असे त्याने सांगितल्याची माहिती पवार यांनी आपल्या सांगोल्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.
डाळिंबावर रोग प्रादुर्भाव होऊ म्हणून कशी काळजी घेतो असा प्रश्न पवार यांनी या तरुण शेतकऱ्याला केला. त्यावर, तो म्हणाला की, बाग स्वच्छ ठेवतो. अजिबात तेथे कचरा ठेवत नाही. फळ तयार झाल्यावर माझे सबंध घर रात्री मुक्कामालाही तेथेच असते. मी कष्ट केले म्हणून रोगाच्या प्रादुर्भावाचा संभव तुलनात्मक कमी आहे. सांगायचे तात्पर्य असे की, संकटं आहेत, परिस्थिती वाईट असली तरी त्याच्या मात करण्याची हिंमत असली की आपण यशस्वी होऊ शकतो. ते काम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाने केले. त्यात सांगोल्याचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल, असे म्हणत सांगोला या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची आणि फुलवलेल्या शेतीची सक्सेस स्टोरीच शरद पवार यांनी सांगितली.