दुर्लक्षित स्थानके, भग्न आगारे अन् खंगणारी लालपरी! मुंबईतील स्थानकांची बिकट अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:11 PM2023-08-21T14:11:52+5:302023-08-21T14:13:59+5:30
एसटीचे वैभव भग्नावस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे
वार्तांकन : सचिन लुंगसे, नितीन जगताप, स्नेहा मोरे, श्रीकांत जाधव, मनोज कुंभेजकर
गणेशोत्सवाची चाहूल लागताच मुंबई महानगरातील चाकरमान्यांना आधार वाटतो तो लालपरीचा!; पण एकेकाळी वैभवशिखरावर असणारी लालपरी आता खंगत चालली असून, तिचे बसस्थानकांचे आणि आगारांचे वैभवही लयास चालले आहे. तसेच मुंबई सेंट्रल, परळ, नेहरूनगर (कुर्ला) आणि बोरीवली स्थानके आता उदास आणि बस आगारे भकास झाली आहेत. कालानुरूप बदल पटकन न स्वीकारल्याने आणि राजकारणाचा संसर्ग झाल्याने एसटीचे वैभव भग्नावस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.
संसार मोठा; पण दुरवस्थाही तितकीच मोठी
२५० आगारे, जवळपास दुप्पट स्थानके, ३१ विभागीय कार्यालये असा राज्यभराचा विस्तार असणारे एसटी महामंडळ वर्षाला सुमारे १० हजार कोटींचे उत्पन्न मिळवते; पण खर्चाचा आकडा १३०० कोटींच्या घरात असल्याने दरवर्षी होणाऱ्या तोट्याच्या खड्ड्यातून महामंडळाच्या लालपरीचे चाक बाहेर पडत नाही. मार्च २०२३ मध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात एसटीचा तोटा होता. तब्बल ४०५० कोटींच्या घरात. सरकारच्या तिजोरीतून दिलेल्या मदतीमुळे या लालपरीचा संसार कसाबसा सुरू आहे.
मुंबई सेंट्रल एसटी आगारात तात्पुरती डागडुजी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाचे (एसटी) मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या आगारातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याची छायाचित्रे सर्वत्र शेअर केली गेली. २५ मे रोजी ही खड्डे बुजवा मोहीम सुरू केली खरी, पण अवघ्या काही महिन्यांत आगारातील अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्यच पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पेव्हर ब्लॉक, खडी टाकून खड्डे भरण्यास सुरुवात झाली असे राज्यातील एसटी आगारांबाबत एसटीच्या मुख्य स्थापत्य अभियंता विद्या भिल्लार ज्यांनी सांगितले होते. दिवसभर दमून-भागून आलेल्या चालक, वाहकांना चांगली झोप लागावी, यासाठी वातानुकूलित विश्रांतिगृह बांधून देण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. महिला विश्रांतिगृहात सुधारणा आहे. पुरुष विश्रांतिगृहात मात्र सुविधांचा अभाव आहे.
मुंबई सेंट्रल बसस्थानकाबाबत वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर येथे तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. प्रशासनाने मलमपट्टी न करता कायमस्वरूपी व्यवस्था करावी. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस
सायन एसटी थांब्यावर प्रवाशांपेक्षा फेरीवाले जास्तच; दादर एसटी स्थानकात कर्मचाऱ्यांचा अभाव; वाहतूककोंडीचा अड्डा!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एसटी बसेसच्या अद्ययावत फलकाचा अभाव, प्रवासी सोयीसुविधांची उणीव आणि रात्रीच्या वेळी कार्यालयच बंद असणे अशी बिकट अवस्था सायन एसटी बसथांब्याची आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. एकेकाळी शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत बसलेले दिसायचे. मात्र, सायन थांब्यावर आता प्रवाशांपेक्षा फेरीवालेच जास्त दिसतात. सायन एसटी थांबा खूपच जुना थांबा आहे. या थांब्यावरून मोठ्या प्रमाणात अलिबाग, मुरुड, पेन, रोहा, महाड, पोलादपूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली आणि सातारा येथे एसटी बसेस जात असतात. मुंबई आणि उपनगरच्या मध्यवर्ती असल्याने हा थांबा अनेकांना सोयीचा ठरतो. सायन रुग्णालयात उपचारासाठी येणारे याच थांब्यावर उतरतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या थांब्याची खूपच दुरवस्था झाली आहे. स्थानिक आमदारांच्या निधीतून आता थांब्याचे सुशोभीकरण करण्यात आले. तरीही प्रवाशांसाठी महत्त्वाचा बसेसचा अद्ययावत फलक, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची अचूक माहिती, आरक्षण सुविधा, रात्रीच्या वेळेस माहितीसाठी कार्यालय यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी येथे दिसून येत नाहीत. अनेक गोष्टींची येथे उणीव भासते. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या बेभरवसा येथून प्रवास करावा लागतो. सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे रात्रीच्या वेळी येथे दारुड्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेषतः महिला प्रवाशांना खूप भीती वाटते. रुग्णालय जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले फिरत असतात.
गेली पस्तीस वर्षे आम्ही याच थांब्यावरून प्रवास करीत आहोत. पूर्वी रात्रीच्या वेळी खूप गाड्या सुटायच्या; पण आता दिवसासुद्धा गाडी वेळेत येते की नाही, हेच कळत नाही. एकाही गाडीची वेळ निश्चित नसते. - सुगंधा म्हात्रे, अलिबाग-मुरुड प्रवासी
एकाच परवान्यावर अनेकजण बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या विक्रेत्यांकडून निकृष्ठ दर्जाच्या मालाची विक्री होते व प्रवाशांना नाहक त्रास होतो. यावर एस टी प्रशासनाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. - संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
दादर एसटी स्थानकात खासगी गाड्यांची दादागिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरात मध्यवर्ती बसथांबा म्हणून दादर एसटी बसथांब्याला अनेकांची पसंती असते. मात्र, या एसटी स्थानकातून शासकीय बसेसपेक्षा खासगी बसेस, गाड्यांचा मोठा विळखा असतो. त्यामुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. साधी एसटीची चौकशी करायलासुद्धा कार्यालयात अधिकारी नसल्याचे प्रवाशांच्या तक्रारी आहेत. दादर एसटी थांबा महामार्गावर असल्याने मुंबईतून बाहेरगावी जाताना हा थांबा विशेष महत्त्वाचा आहे. एकेकाळी सर्वाधिक एसटी बसेस येथून सुटायच्या. आता या थांब्याचा लौकिक राहिलेला नाही. एसटी बसेसची संख्या कमी झाली असून, खासगी बसेस येथे जास्त उभ्या असतात. मुंबई-पुण्यासाठी जाणाऱ्या खासगी वाहनांचा विळखा या थांब्याला असतो. त्यामुळे येथे एसटी थांबा आहे की नाही, हेच लोकांना कळत नाही. एसटी गाड्यांसंदर्भात योग्य माहिती मिळत नाही. कार्यालयात अधिकारी नसतात, स्थानकात स्वच्छता दिसून येत नाही. शौचालय कंत्राटदार दिले तरी स्वच्छता ठेवली जात नाही, त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्रवाशांच्या आहेत.
दादर कार्यालयात नियंत्रक असतात. ते प्रवाशांना माहिती देतात. खासगी वाहने हटविण्यासाठी आम्ही वारंवार वाहतूक पोलिसांशी संपर्क साधतो. शिवाय आमचे सुरक्षा कर्मचारीसुद्धा येथे असतात. -नितीन चव्हाण, डेपो मॅनेजर, परळ
बोरीवलीत साधं प्यायला पाणी मिळत नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, बोरीवली : १९९४ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे विभाग बोरिवली स्थानक नॅन्सी हा एसटी डेपो सुरू झाला होता. रोज पहाटे ४ ते थेट मध्यरात्री ११:४५ पर्यंत येथून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि अन्य ठिकाणी सुमारे २२० एसटी बस सुटतात. गणपती, दिवाळी, उन्हाळ्यात येथे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन जास्त बस गाड्या सोडल्या जातात. तर, बोरीवली स्वारगेटकडे जाणाऱ्या आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दर एका तासाला सुटणाऱ्या शिवनेरी गाड्या आहेत. विशेष म्हणजे येथे शिवनेरी इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉइंटसुद्धा केला आहे. तर, सुरक्षारक्षक आणि एसटी बस दुरुस्तीसाठी मेकॅनिक सुद्धा आहे. असे दावे केले जात असले तरी स्वच्छता आणि सुव्यवस्था याबाबतची वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. वाहतूक निरीक्षक संदीप पवार यांच्यामते प्रवाशांसाठी येथे पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था आणि प्रवेशद्वारावर छोटेसे कॅन्टीन आहे. आमदार फंडातून स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान मे २०२३ ते एप्रिल २०२४ अंतर्गत सुशोभीकरण सुरू आहेत. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, चौकशी व तिकीट आरक्षणची व्यवस्था, सूचना फलकाची व्यवस्था, खडी टाकून रस्त्याचे लेव्हलिंग करणे आदी कामे सुरू असून गणपतीच्या आधी हा डेपो प्रवाशांसाठी खुला होईल, असा दावा संदीप पवार यांनी केला.
नॅन्सी स्थानकाची दुरवस्था, वस्तुस्थिती वेगळीच
- बोरीवली -ठाणे मार्गावर दर अर्ध्या तासाला ठाण्यासाठी साधी व शिवशाही बिगरवाहक बसेस सुटतात आणि या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र प्यायला पाण्याची सोय नाही, पाणी बाहेरून आणावे लागते, कॅन्टीनची सुविधा नाही.
- येथे टेलिफोन व्यवस्था अनेक महिने बंद असल्याने नागरिकांना चौकशी केली असता माहिती मिळत नाही. तर या एसटी डेपोत सुरक्षारक्षकच नाही. छोट्या जागेत बसण्यासाठी आसन व्यवस्थादेखील जुनी झाली असून प्रवाशांना आरक्षण व्यवस्था आहे. चौकशीसाठी वेगळी चौकी असून प्रवाशांना बसेसची माहिती दिली जाते. तर ठाण्यासाठी जाणाऱ्या बसेससाठी वेगळा फलाट आहे.
- तर खासगी शौचालयाची व्यवस्था आहे. कामगारांना महागाई भत्ता बाकी आहे, दोन करार झाले नाहीत, थकबाकी मिळाली नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले पण अजून आम्हाला महागाई भत्ता मिळाला नाही, अशी येथील कामगारांची कैफियत आहे.
परळ आगार बेवारस; प्रथमोपचार पेट्यांमध्ये साहित्याचा तुटवडा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मागील काही वर्षांत एसटी गाड्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे अपघातांच्या घटना वारंवार समोर येत असताना, परळ एसटी आगारात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेट्याच सक्षम नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. प्रवाशांसह चालक, वाहकांवर प्रथम उपचार करण्यासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले. या आगाराच्या परिसरात अनेकदा बेघर आसरा घेतात, तसेच काही नागरिक आगारातील बाकड्यांवरच झोप घेणेही पसंत करतात. यांना कुणीही हटकत नाही वा त्यांना जाब विचारत नसल्याचे दिसून येते.
३०१४ - राज्यात २०२२- २३ या वर्षात एसटीचे ३ हजार १४ अपघात झाले आहेत. त्यात २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये अनेकदा प्रथमोपचाराकडे होत असलेले दुर्लक्ष ही गंभीर बाब असल्याचे दिसून येते.
नियम धाब्यावर- एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, त्या आगार, विभाग प्रमुख यांचा दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावेत, असा नियम असतानाही या माहितीचा अभाव दिसून येतो.
आरटीओचे भंगार कुर्ला नेहरूनगरच्या गळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुर्ला पूर्वेकडील राज्य परिवहन महामंडळाचे नेहरूनगर बस स्थानक विस्तीर्ण अशा जागेवर पसरले असले तरी यातील बहुतांशी जागेचा वापर हा भंगारात गेलेली वाहने ठेवण्यासह डेब्रिज ओतण्यासाठी केला जात आहे. दूर्देव म्हणजे बस स्थानकाच्या अधिकऱ्यांनी भंगाराच्या वाहनांचे बोट आरटीओकडे दाखवले असून, डेब्रिजबाबत मात्र काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे स्थानकातील डिजिटल बोर्ड बंद आहेत. भिंतीवर ठिकठिकाणी प्लास्टर निखळले असून, शेवाळे उगवले आहे. भटक्या श्वानांनी स्थानकाला आपले घर केले असून, या सगळ्या अस्वच्छेतवर स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आल्याचा दावा अधिका-यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने कुर्ला नेहरूनगर बसस्थानकात सुरू झालेले स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान एप्रिल २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
- प्रवाशांना एसटीच्या वेळा समजाव्यात म्हणून लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डपैकी निम्मे बोर्ड बंद आहेत.
- हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्याला टाळे ठोकण्यात आले आहे.
- स्थानकाच्या कोपऱ्यावर, शौचालयाच्या परिसरात मातीचे ढिगारे पडले आहेत.
- बैठक व्यवस्थेवर ढिगाने पंखे लावण्यात आले आहेत. मात्र खाली बसलेल्या प्रवाशांना त्याची हवा लागत नाही.
- तिकिटासाठी आरक्षण खिडकी असली तरी तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. दोन बाकडे असून, येथे गर्दी झाली तर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.
- बैठक व्यवस्थेमध्ये लावण्यात आलेले दिवे दिवसा तेवत असणे गरजेचे असताना ते बंद असतात.
- बसस्थानकाच्या भिंतीवर ठिकठिकाणी रंग उडाला आहे. ठिकठिकाणी जाळ्या लागल्या आहेत. भिंतीवर शेवाळे आले आहे.