मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. परंतु भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास वेगळा कसा व्हायला हवा याचा विचार सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली होती. त्यात राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व शिवसेना यांचा जाहीरनामा आणि आगामी निवडणुका व पक्षवाढी संदर्भात यावर सविस्तर चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याचीही बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याऐवजी जे काही म्हणणे आहे, विचार आहेत ते मांडले जातील किंवा त्याची चर्चा मुख्यमंत्र्याकडे केली जाईल, असेही स्पष्ट केले. भाजपकडे सध्या कोणताही विषय हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील विषय त्यांनी निवडून ते आंदोलन करत असावेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे, असेही पाटील म्हणाले.‘निवडणुका एकत्र लढविण्याची चर्चा’या वर्षात जिल्हा परिषदा आणि इतर निवडणुका येत असून त्या अनुषंगाने मंत्र्यांना सूचना करण्यात आल्या. शिवाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा निवडणुका लढवता येतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.