Join us

पंकजा मुंडेंशी कसलेही मतभेद नाहीत: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 3:55 AM

पक्षचौकटीतच काम करण्याचा पंकजा यांना दिला सल्ला

मुंबई : पंकजा मुंडे मला बहिणीसारख्या आहेत. त्यांच्याशी माझा कालही संवाद होता आणि भविष्यातही राहील. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काल गोपीनाथ गडावरील सभेत एकनाथ खडसे जे बोलले ते तसे बोलले नसते तर बरे झाले असते. त्यांच्या मनात काहीही नसते पण बोलण्याचे ते स्वत:चे नुकसान करवून घेतात, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी या मुलाखतीत दिली.

पंकजा यांच्याविरुद्ध फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना ताकद दिली असा आक्षेप आहे याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, उलट माझ्या सरकारच्या काळात धनंजय यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला. पक्षाने पंकजा यांना कधीही एकटे पाडलेले नाही. चिक्की घोटाळ्यात त्यांच्यावर विधिमंडळात आरोप झाले, धनंजय यांनी आक्षेप घेतले तेव्हा ते सगळे मी आणि चंद्रकांत पाटील यांनी खोडून काढले.

पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलनं करण्याची घोषणा कालच्या मेळाव्यात केली आहे त्यास आपली व भाजपची सहमती आहे का या प्रश्नात फडणवीस म्हणाले की प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जरूर काम करावे पण आंदोलन, पक्षाचा कार्यक्रम हे त्यांनी भाजपच्या चौकटीत राहूनच करावे, असे माझे मत आहे. मी त्यांच्याशी स्वत: बोलेन आणि जे काही त्यांच्या मनात आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. ओबीसींकडे पक्षाने दुर्लक्ष केले हे खरे नाही. आजही पक्षाचे सर्वाधिक ३७ आमदार हे ओबीसी आहेत. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय आमच्या सरकारने सुरू केले.

सध्याच्या सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध असून हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत फडणवीस यांनी वर्तविले. मी भविष्यवेत्ता नाही पण तीन विरुद्ध दिशांना असलेल्या चाकांचे हे आॅटोरिक्षा सरकार आहे, असे ते म्हणाले.

फसलेल्या गनिमी काव्याचे अजित पवार नायक

अजित पवार यांच्याविषयी मनात काय भावना आहे, असे विचाारले असता फडणवीस हसत म्हणाले की, आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे ते नायक आहेत आणि मी सहनायक. संजय राऊत यांच्याविषयी फडणवीस म्हणाले की राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ज्या पद्धतीने बोलतात वा लिहितात त्या बाबत त्यांनी संयम पाळणे आवश्यक आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेभाजपामहाराष्ट्र सरकारअजित पवार