लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाचे शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष हे येत्या १४ जूनपासून सुरू होणार आहे, असे शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्टी संदर्भातल्या परिपत्रकात जाहीर केले आहे. मात्र, मे महिनाअखेर ही नवीन शैक्षणिक वर्षात ते यंदा कसे सुरू करणार, ते ऑनलाईन असणार का ऑफलाईन, मुख्याध्यापकांसाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत याबाबत काहीच माहिती शाळांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करताना सगळ्या गोष्टींचा, विषयांचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा, चाचण्या यांचा नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे आवश्यक असणार आहे. सद्य:स्थितीत जरी निर्बंध उठणार नसले तरी आणि शिक्षण ऑनलाईन असले तरी त्याचेसुद्धा तासिकानिहाय नियोजन करावे लागणार आहे. मागील वर्षी काही महत्त्वाच्याच विषयांचे ऑनलाईन नियोजन करण्याच्या सूचना होत्या. मात्र, यावर्षी तसे न करता सगळ्या विषयांचे नियोजन शाळांना करावे लागणार असल्याची माहिती उपनगरातील शाळेच्या एका मुख्याध्यापकांनी दिली.
महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकणार नाहीत, त्यांनाही शिक्षण पोहोचविण्याची अतिरिक्त जबाबदारी शाळा प्रशासनावर असणार आहे. लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाले, तर नवीन शैक्षणिक वर्षासाठी, दहावी बारावी मूल्यांकनासाठी शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावण्याचे नियोजनही करावे लागणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने आताच मार्गदर्शक सूचना दिल्या असत्या तर संस्थाचालकांना, मुख्याध्यपकांना त्याप्रमाणे शैक्षणिक वेळापत्रक तयार करता आले असते, अशा प्रतिक्रिया मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.
कोट
वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे होते. यामुळे आम्हाला शाळा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन यासाठी वर्षभराचे वेळापत्रक तयार करण्यासाठी वेळ मिळाला असता.
- पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई.