Join us  

आंदोलनाशिवाय घरे नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 2:47 AM

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ न दिल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा महिनाभरापूर्वी दिल्यानंतरही वेळ देण्यात न आल्यामुळे संतप्त गिरणी कामगारांनी शुक्रवारी

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ न दिल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा महिनाभरापूर्वी दिल्यानंतरही वेळ देण्यात न आल्यामुळे संतप्त गिरणी कामगारांनी शुक्रवारी सीएसटी येथील महापालिका मार्ग अर्धा तास बंद पाडला. पोलिसांनी धरपकड केल्यानंतरही आंदोलनाचा जोर कमी न झाल्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. भेट यशस्वी झाल्याची माहिती गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी दिली. आंदोलन केल्याशिवाय घरे मिळणार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गिरणी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यास महिनाभरात मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. संतप्त गिरणी कामगारांच्या सहा प्रमुख संघटनांनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात धडक दिली. कामगारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेले. दोन वाजेपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर जेल भरो आंदोलन करा, असा इशारा शिष्टमंडळातील नेत्यांनी कामगारांना दिला होता. मात्र आधी विधानभवनात आणि नंतर विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असल्याने शिष्टमंडळाला ताटकळत उभे राहावे लागले.दुसरीकडे आझाद मैदानात आणि महापालिका मार्गाच्या पदपथावर हजारो कामगार निर्णयाची वाट पाहत होते. अखेर दोन वाजेपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने जेल भरो आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला. पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतरही आंदोलक न पांगल्यामुळे पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर आंदोलनकर्ते पुन्हा आझाद मैदानात परतले. दुपारी २.१५ गिरणी कामगारांनी दुपारी २ वाजता जेल भरोची घोषणा केल्याने बेसावध पोलिसांची तारांबळ उडाली. आझाद मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करत आंदोलकांना थोपवून ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र पदपथावर असलेल्या हजारो गिरणी कामगारांना अडवण्यात ते अपयशी ठरले. दुपारी २.३० संतापलेल्या गिरणी कामगारांनी सीएसटीहून मेट्रो सिनेमाकडे जाणारी आणि मेट्रोहून सीएसटीकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली. रस्त्यावर ठिय्या दिला. सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल अर्धा तास सीएसटी परिसरात वाहतूक बंद पडली होती. दुपारी ३ : अर्धा तास आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. मात्र रस्त्यावरील आंदोलकांची संख्या संपता-संपत नव्हती. अखेर दुपारी तीन वाजता पोलीस अधिकारी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करू लागले. मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक यशस्वी ठरल्याचेही पोलीस सांगत होते. गिरणी कामगारांच्या काही नेत्यांनीही त्यास दुजोरा देत शांततेचे आवाहन केले. आणि साडेतीनच्या सुमारास आंदोलक पुन्हा मैदानात परतले.>>७.५० लाखांत घरे द्या!घरांच्या किमतीवर १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती ७ लाख ५० हजारांहून अधिक असता कामा नयेत, अशी मागणी गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी केली आहे. वरळी आणि शिवडी येथील गिरणीच्या जागेवरील २ हजार ५०० घरे आणि एमएमआरडीएने पूर्ण केलेल्या २ हजार ८०० घरांच्या किमतीबाबत ही मागणी आहे. त्यातील एमएमआरडीएची घरे उपनगरांत असल्याने त्यांची किंमत म्हाडाच्या घरांहून कमी असावी, अशी मागणीही घाग यांनी केली आहे.