Join us

रेल्वे सेवा सुरु होण्याच्या अद्याप सूचना नाहीतच, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये याची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:51 PM

२२२ लांबपल्याच्या गाड्या मध्य रेल्वेच्या मुंबई,पुणे, सोलापूर, नागपूर मंडळात सुरक्षेच्या निगराणीखाली

अनिकेत घमंडी, डोंबिवली 

मध्य रेल्वेच्या १५५ उपनगरीय लोकल कारशेडमध्ये सुरक्षित असतांनाच लांबपल्याच्या २२२ रेल्वे गाडया या मुंबई, सोलापूर, पुणे, नागपूर या चार विभागात लॉकडाऊनपासून उभ्या आहेत. त्या गाड्या कधी सुरु होणार याबाबत अजूनही कसलेच केंद्रिय रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाचे नीर्देश आलेले नाहीत. त्यामुळे रेल्वे सेवा कधी सुरु होणार याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. उपनगरिय लोकल जरी कारशेडमध्ये नेण्यात येत असल्या तरी लांबपल्याच्या गाड्या मात्र ठिकठिकाणी स्थिर असून त्या जिथे आहेत त्या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

देशभर लाखो प्रवाशांची यातायात करणा-या लांबपल्याच्या गाड्यांचे रेक्स हे ठिकठिकाणी उभे असून त्यांच्यावर काही ठिकाणी सीसी टीव्ही तर जेथे ती सुविधा नाही तेथे रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्या गाड्यांची इंजिन देखिल विविध ठिकाणी उभी असून  त्यांची देखभाल मात्र सर्वत्र केली जात आहे. अनेक इंजिन ही सध्या सुरु असलेल्या मालगाड्यांची वाहतूकीसाठी टप्प्यांवर चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये कल्याण, मुलुंड, इगपुरी, लोणावळा या भागात देखिल इंजिन सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्याच पद्धतीने पुणे, नागपूर, सोलापूर या मंडळांमध्येही ती सेवा कार्यरत आहे. 

जेथे लांबपल्याच्या गाड्यांचे डबे उभे आहेत त्या डब्यांमधील पंखे, स्वच्छतागृहांमधील नळ, वॉशबेसिन, डब्यांमधील पंखे, दिवे तसेच वातानुकूलीत डब्यांमधील अन्य सुविधा, आरसे आदींची चोरी होऊ नये यासाठी आरपीएफचे जवान सतर्क ठेवण्यात आले आहेत.  राष्ट्रीय संपत्तीवर दगडफेक होऊ नये, त्याचे नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान जेथे आवश्यकता आहे तेथे वेळोवेळी डबे स्वच्छ करणे, निर्जंतुक करणे ही कामे देखिल करण्यात येत आहेत.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यारेल्वे