मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:26+5:302021-07-18T04:06:26+5:30
मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे शनिवारी ...
मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे शनिवारी रात्री ११ ते रविवारी मध्यरात्री ३ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक राहणार नाही, तसेच मध्य रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे- वाशी- नेरूळ- पनवेल अप व डाऊन ट्रान्सहार्बरमार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० यादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१९ या वेळेत वाशी- नेरूळ- पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल- नेरूळ- वाशी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप सेवा ब्लॉक कालावधीदरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी- वांद्रे डाऊन हार्बरमार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेदरम्यान आणि चुनाभट्टी- वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बरमार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी- बेलापूर- पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बरमार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ यादरम्यान वांद्रे- गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० यादरम्यान पनवेल- बेलापूर- वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बरमार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेदरम्यान गोरेगाव- वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बरमार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.