Join us

शहरातील १.१८ लाख मतदारांचे मतदारयादीत फोटोच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:06 AM

८ जुलैपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास नावे वगळणार : जिल्हाधिकारी निवतकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

८ जुलैपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास नावे वगळणार : जिल्हाधिकारी निवतकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले एक लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये आढळून येत नाहीत, अशा मतदारांनी संबंधित मतदारसंघात जाऊन आपले छायाचित्र ८ जुलैपूर्वी जमा करावे अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर, जिल्ह्यात मतदार यादी शुद्धिकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी देण्यात आल्या. मुंबई शहर, जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघांतील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदार संघाचे कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निर्धारित मुदतीत छायाचित्र जमा न केल्यास आपण सदर मतदारसंघातून स्थलांतरित आहात अथवा सदर मतदारसंघात राहत नाही असे गृहीत धरण्यात येऊन नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी आपणास काही शंका असल्यास किंवा यासंदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधित जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.