घरोघरी वृत्तपत्रांच्या वितरणावर निर्बंध नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:34 AM2020-07-03T04:34:23+5:302020-07-03T04:34:35+5:30
राज्यात अनलॉक अंतर्गत मिशन बिगिनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, मुंबई महानगरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विविध यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी झाले आहेत
मुंबई : अनलॉक असतानाही मुंबई महानगर क्षेत्रात विविध यंत्रणांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहे. त्यात घरोघरी वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. तसे असले तरी काही गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी वृत्तपत्र वितरणावर आक्षेप घेत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
वास्तविक, सध्याच्या अतिशय गोंधळाच्या काळात खात्रीशीर माहिती पोहोचवण्याचे ‘वृत्तपत्र’ हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळेच पूर्वीप्रमाणे आरोग्याचे सगळे नियम पाळून वृत्तपत्रांचे वितरण सुरूच राहील, असे यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात अनलॉक अंतर्गत मिशन बिगिनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, मुंबई महानगरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विविध यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दोन किलोमीटर परिघातच प्रवासाची मुभा दिली आहे. तर, मुंबई महानगर क्षेत्रातील नऊपैकी सहा महापालिका क्षेत्रांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यंत्रणांनी ताठर भूमिका घेतल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या नियमांच्या विपरीत कोणतेच निर्बंध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊ नयेत, असे सहकार विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रांचे वितरण पूर्वीप्रमाणेच सुरू असून त्यावर कोणतेच निर्बंध नसल्याचे यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.