मुंबई - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात आले होते. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते दळणवळण अतिशय गतीमान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यातून, राज्यातही मोठ्या प्रमाणात रस्ते बांधण्यात येत आहेत. महामार्गांचे रुंदीकरणही होत आहे. मात्र, कंत्राट देण्यात आलेल्या कंपन्यांकडून वेगमर्यादेच फलक लावण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, वाहनचालकांना अचानक दंड वसुल झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
औरंगाबादहून सोलापूरला केवळ 4 तासांत तुम्ही पोहोचाल असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या उद्घाटनवेळी म्हटले होते. मात्र, या महामार्गावरुन 90 किमी प्रति तास यापेक्षा वेगाने गाडी पळवता येत नाही. कारण, पोलिसांची इंटरसेक्टर गाडी महामार्गावर तुमच्याकडे लक्ष ठेऊन असते. या वाहनातील स्पीडगनद्वारे ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांवर दंड करण्याचं काम या पोलीस यंत्रणेद्वारे होते. विशेष म्हणजे महामार्गावर दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट नसलेल्यांनाही ऑनलाईन फाईन या यंत्रणेद्वारे करण्यात येते.
राज्यातील विविध महामार्गांवर ही वेगमर्यादा सरकारने घालून दिलेली आहे. अपघात टाळण्यासाठी निश्चित वेगमर्यादेचं पालन व्हायला हवं. मात्र, याच महामार्गावर वेगमर्यादेची माहिती देणार फलक कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे, कोणत्या महामार्गावर किती वेगाने गाडी चालवायची याचा काहीच अंदाज गाडीचालकांना येत नाही. त्यामुळे, अचानक गाडी नंबरवर ऑनलाईन फाईन बसल्यानंतर मनस्ताप सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच वाहनचालकांपुढे उरत नाही. त्यामुळे, वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. तसेच, महामार्गावर स्पीड लिमीट दर्शविणार बोर्ड झळकवावेत अशी मागणीही होत आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरही तीच परिस्थती असल्याचे दिसून येते. या महामार्गावरही रस्त्याची वेगमर्यादा दर्शवणारे फलक दिसून येत आहे, असतील तरी संख्येनं कमी प्रमाणात आणि तेही दिसून न येण्याजोगेच आहेत. औरंगाबाद ते पाडळशिंगी टोलनाका या 120 किमी अंतरावर केवळ 4 फलक आहेत, ज्यामध्ये वेगमर्यादेचा उल्लेख आहे, अशीच अवस्था सर्व महामार्गावर आहे. त्यामुळे, वाहनचालकांना वेगमर्यादा कळणार तरी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, स्पीड लिमीटचे फलक नसताना आम्ही किती दिवस दंड भरायचा, असा सवालही प्रवाशी, वाहनचालक विचारत आहेत.