Join us

'पवारांच्या घरावर हल्ला करणारे ST कर्मचारी नाहीत', संजय राऊत पवारांच्या भेटीला 'सिल्वर ओक'वर पोहोचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 11:06 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी हल्ला केला. दगडफेक आणि चप्पल फेक करुन आंदोलकांनी मोठा राडा घातला होता.

मुंबई-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी हल्ला केला. दगडफेक आणि चप्पल फेक करुन आंदोलकांनी मोठा राडा घातला होता. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विविध नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यासंबंधी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे. 

"शरद पवारांच्या निवासस्थानावर केलेला हल्ला हे आंदोलन नव्हतं. तर तो एक कट होता. हल्ला करणारे एसटी कर्मचारी नव्हते. असं आंदोलन आजवर कधीच महाराष्ट्रानं पाहिलेलं नाही. शरद पवार यांचा एसटी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. आंदोलनामागे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत त्यांचा शोध लावला गेला पाहिजे. महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही अतृप्त आत्मा षडयंत्र रचत आहेत याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढली पाहिजेत", असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. 

"शरद पवार देशाचे अनुभवी नेते असून एसटी कर्मचाऱ्यांना कोण उचवण्याचं काम करतंय हे सर्वांना माहित आहे. ज्यांच्यामुळं हे घडलं त्यांना कुणाचं पाठबळ आहे हेही सर्वांना माहित आहे. पण महाराष्ट्रात अशाप्रकारच्या राजकारणाची संस्कृती नाही. आज तुम्ही अशा प्रकारे हल्ले घडवून आणत आहात. पण हे लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा काचेच्या घरात राहता", असंही संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, संजय राऊत आता शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर पोहोचले आहेत. काल झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? विरोधी पक्षाचा दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना कुणाचा पाठिंबा आहे हे सर्वांना माहित आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठी सदावर्तेंना फंडिंग केलं जातं", असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :संजय राऊतशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा