राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:59 AM2020-03-02T05:59:01+5:302020-03-02T05:59:15+5:30
नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचा कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मुंबई : नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचा कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली असून, नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये भरती असलेला प्रवासी कोरोनासाठी निगेटिव्ह आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आजवर भरती झालेल्या १२५ प्रवाशांपैकी ११८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५ जण मुंबईत तर प्रत्येकी १ जण पुणे आणि नाशिक येथे भरती आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ५१५ विमानांमधील ६१ हजार ९३९ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशांतील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशांतील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.
आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३७० प्रवासी आले आहेत. त्यापैकी २४१ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने, राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १२५ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर ४ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील.