मुंबई : सत्ताधारी भाजपने देशभर ‘मैं भी चौकीदार’ अभियानाला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपकडे उत्तर नाही. झालेल्या आरोपांना संवेदनशीलतेने उत्तर देण्याचे आत्मबळच भाजपकडे राहिलेले नाही. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात, अशी टीका प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भाजपच्या मैं भी चौकीदार अभियानाबाबत चव्हाण म्हणाले की, सत्तेत आल्यापासून जनता, विरोधी पक्ष, माध्यमे आणि न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांपासून भाजप पळ काढत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील दिलीप कांबळे या मंत्र्यांवर लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल आहे. लाचखोरीबद्दल त्यांची हकालपट्टी करण्याचे सोडाच, परंतु त्याची दखल घेण्याची नैतिकताही भाजपमध्ये राहिलेली नाही. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या चौकशीतील दिरंगाई व अकार्यक्षमतेबद्दल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे चव्हाण म्हणाले.‘टेंभा मिरवायला मोकळे’माध्यमांकडे आणि विरोधकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण भाजप राबवत आहे. दुर्लक्ष केल्याने माध्यमांकडून प्रश्न उपस्थित करणेच बंद होईल आणि जनतेची स्मरणशक्ती कमजोर असल्याने तेही विसरून जातील. त्यानंतर आपण पारदर्शकता व नैतिकतेचा टेंभा मिरवायला मोकळे, अशी कुटिल नीतीच भाजप काही वर्षे वापरत आहे. परंतु, भाजपचा हा कोडगेपणा आणि राजकीय उन्माद काँग्रेस जनतेच्या न्यायालयात घेऊन जातच राहील, असे चव्हाण म्हणाले. भाजपने तत्काळ दिलीप कांबळेंची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.