३५0 चौरस फुटांंच्या घरात दोन अधिक दोनच कुटुंब, अनेक जण एकटेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:49 AM2019-05-15T01:49:16+5:302019-05-15T01:49:32+5:30

जेमतेम ३५० ते ४०० चौरस फूट आकाराचे घर. त्यात आई-वडील, पत्नी, मुले. शिवाय काहींचा लहान भाऊ आणि लग्नाला आलेली बहीण.

 There are only two more families in the 350 square foot house, many are alone | ३५0 चौरस फुटांंच्या घरात दोन अधिक दोनच कुटुंब, अनेक जण एकटेच

३५0 चौरस फुटांंच्या घरात दोन अधिक दोनच कुटुंब, अनेक जण एकटेच

Next

मुंबई : जेमतेम ३५० ते ४०० चौरस फूट आकाराचे घर. त्यात आई-वडील, पत्नी, मुले. शिवाय काहींचा लहान भाऊ आणि लग्नाला आलेली बहीण. या सर्वांनी राहायचे कसे? अशा प्रकारे एका घरात राहणाऱ्यांना कुटुंब तरी म्हणायचे कसे? कोणी स्वयंपाक घरात, कोणी इमारतीच्या गच्चीवर, तर कोणी घराबाहेरच्या लॉबीतच पथारी पसरलेली. मुंबई आणि परिसरात असंख्य घरांची ही स्थिती आहे.
सकाळ होताच भाऊ लगेच घराबाहेर पडतो, मग मुले शाळेत निघून जातात, कर्ता पुरुष आणि पत्नी नोकरीसाठी जातात. राहिलेच तर म्हातारे आई-वडील. म्हणजे तेही एकटेच. त्या दोघांनाच कुटुंब म्हणायचे? संध्याकाळी सारे घरी आले की घरात गर्दी होते. टीव्हीचा आवाज त्यातच. बायको, बहीण, आई स्वयंपाक घरात, पुरुष टीव्हीसमोर. त्यातच काहींच्या हातात मोबाइल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण नाहीच. सर्वांनी एकत्र जेवायचं ठरवलं, तरी बसायला जागा नाही. त्यामुळे जेवणंही टप्प्याटप्प्यानं. खानावळीमध्ये असतं, तसंच वातावरण.
याला कुटुंब म्हणायचं?
मुंबईत अनेक पुरुष एकटेच राहतात. अशांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. एक खोली भाड्याने घ्यायची. त्यात ७/८ लोकांनी एकत्र राहायचे. कोणाची रात्रपाळी, कोणाची दिवसपाळी. त्यामुळे किमान झोपायची सोय होते. सर्वांचे जेवण एकत्र. जे पटकन होते, तेच जेवण. वर्षातून एखाद-दुसऱ्यांदा गावाला जायचे. तेव्हा मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ , बहिणीला भेटायचे. एरवी स्वस्त झालेल्या डेटा पॅकमुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करून बायकोशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यातही तिच्याच अडचणी ऐकायच्या.
याला कुटुंब म्हणायचं?
लाखो पुरुष मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत अशा प्रकारे वर्षानुवर्षं राहत आहेत. म्हणजेच तितकी लाख कुटुंब गावाकडे. दुसरीकडे आणखी वेगळे चित्र. अनेक मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण, नोकरीसाठी परदेशांत आहेत. त्यामुळे मुंबईत केवळ आई-बाप. मुलगा कधी येणार, तो फोन कधी करणार, याची वाट पाहणारे. मुलगा येण्याची शक्यता नाही. पण त्याची वाट पाहत अशीच वर्षं घालवायची.
याला कुटंंब म्हणायचं?
ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना माहीत असलेली. पण कुटुंब दिनाच्या निमित्ताने अशांचीही आठवण व्हायलाच हवी. त्यांना कुटुंब दिनाच्या शुभेच्छा देणार तरी कोण? आणि त्या द्यायच्या तरी कशा?

याला कुटुंब म्हणायचं का?
नवरा-बायकोला बोलायला वेळ नाही. दोघेही थकून आलेले. अंग कधी टेकतोय, अशी स्थिती. त्यामुळे प्रेम, ओलावा नाही. मुलांचा अभ्यास घेण्याचीही ताकद शिल्लक नसते. देवपूजा सकाळी कशीबशी आटोपायची असते.
बाथरुम व टॉयलेटमधील माणूस कधी बाहेर येतो आणि आपण कधी आत शिरतो, याची वाट पाहणारे अनेक जण. बाहेर हातात टॉवेल, तोंडात ब्रश घालून येरझाºया घालत आहेत. बोलायला कोणालाच वेळ नाही. बोलणे कामापुरते. अशा वेळी फक्त कुरकुरच असते घरात.

Web Title:  There are only two more families in the 350 square foot house, many are alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार