तुमच्या रस्त्यांवर खड्डे आहेत; मग ‘रोड मार्च’ मध्ये सामील व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:21 PM2020-09-02T13:21:07+5:302020-09-02T13:22:15+5:30
रस्त्यांवरचे एंड पिलर ठरतायेत धोकादायक
मुंबई : आता एका महिन्यात पावसाळा संपणार असला तरी अद्यापही मुंबईतलेखड्डे काही महापालिकेने भरलेले नाहीत. परिणामी संपुर्ण मुंबई खड्ड्यांनी भरली असून, हे खडडे भरण्यात यावेत म्हणून मुंबईत रोड मार्च मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीम अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परासरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या ३ महिन्यांपासून मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तर रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे हेच समजेनासे झाले आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास होत असतानाच मुंबईत ठिकठिकाणी कंत्राटदारांनी केलेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याने याचीही त्रास मुंबईकरांना होतो आहे. रोड मार्च बाबत अधिक माहिती देताना पंकज त्रिवेदी यांनी सांगितले की, रस्त्यांवरील खड्डे भरण्यात यावेत म्हणून आम्ही रोड मार्च ही मोहीम हाती घेतली आहे. यास तुम्ही अभियान, उपक्रम, मोहीम, चळवळ किंवा काहीही म्हणा. आमचा उद्देश एकच आहे तो म्हणजे रस्त्यांवरील खड्डे भरले गेले पाहिजेत. कोणाचा अपघात झाला नाही पाहिजे. मुंबई महापालिका असो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असो. सिस्टीमला जागे करता आले पाहिजे. यासाठी ही मोहीम आहे. आपण आपल्या परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती या माध्यमातून प्राधिकरणांना दिली तर नक्कीच खड्डे भरण्यास मदत होईल, असा विश्वास पंकज त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे.
......................
८० खड्डे भरले
बोरीवली पूर्वेकडील एम.जी. क्रॉस रोडवरील शेठ गोपालजी हेमराज हायस्कूल परिसरात मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून खड्ड्यांची तक्रार करण्यात आली. परिणामी आजपर्यंत ८० खड्डे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती पंकज त्रिवेदी यांनी दिली.
......................
धोकादयक एंड पिलर
एंड पिलर म्हणजे रस्त्याची रुंदी जेथे संपते तो भाग होय. अशा भागात एक तर डिव्हायडर असतो. किंवा डिव्हायडर नसला तर त्या भागात डांबर, सिमेंट टाकून तो भाग भरला जातो. मात्र हा भाग भरताना दोन्ही रस्त्यांचा स्तर सारखा झाला नाही तर येथे खोलगट भाग राहतो. आणि नेमक्या याच भागात वाहनांची विशेषत: दुचाकींची चाके फसतात. घसरतात. परिणामी अपघात होतो.
......................
अपघातातून वाचलो...
मंगळवारी रात्री ऊशिरा काही खासगी कामानिमित्त पूर्व उपनगरात दाखल होत होतो. यावेळी पूर्व उपनगरातील एका रस्त्यावरील एंड पिलर अत्यंत वाईट स्थितीत होते; आणि आजही आहेत. नेमके याच एंड पिलरमध्ये दुचाकीचे चाक फसले. आणि झालेल्या अपघातात दुचाकीसह मी खाली रस्त्यावर पडलो. मी खाली रस्त्यावर आणि दुचाकी माझ्या अंगावर अशी अवस्था होती. अपघात झाला तेव्हा लगतच्या स्थानिकांनी हात देत रस्त्याच्या बाजुला सुखरुप नेले. दुचाकीचा वेग कमी होता. आणि मागून येणारी वाहने देखील कमी वेगाने होती. त्यामुळे वाचलो, असे कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजारात वास्तव्यास असलेले दुचाकी चालक राकेश पाटील यांनी सांगितले. मात्र प्रत्येकवेळी अशीच परिस्थिती असेल असे नाही. आणि केवळ मीच नाही तर प्रत्येक मुंबईकराला याचा त्रास होतो आहे. त्यामुळे शक्य आहे त्या ठिकाणांवरील समस्या सोडविण्यात याव्यात.