लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई शहरासह उपनगरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, असंख्य खड्ड्यांमुळे रस्ता कुठे आहे, हे शोधावे लागत आहे. आरे कॉलनीमधील रस्त्यांची चाळण झाली असून, याकडे प्रशासन लक्ष कधी देणार? असा सवाल स्थानिकांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासन याकडे कानाडोळा करत असून, यंदा गणपतीसुद्धा खड्ड्यांतूनच आणयाचे का? असाही सवाल स्थानिकांनी केला आहे.
आरेमधील युनिट क्रमांक ५, युनिट क्रमांक ६, आदर्शनगर, मयूरनगर, रॉयल पाम्स येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसात येथील रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. येथील रस्त्यांवरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे प्रमाण कमी असले तरीदेखील खड्ड्यांमुळे त्रास होतो आहे. मुळात या सगळ्याची प्रशासनाला कल्पना नाही, असे नव्हे. मात्र, प्रशासन याकडे लक्षच देत नाही, असे मुंबई काँग्रेस आदिवासी विभाग अध्यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले.
येथील रस्त्यांवर जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. शिवाय गाडीला हादरे बसत असल्याने गाडीचा खर्च वाढतो तो वेगळाच. या रस्त्यांची जबाबदारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्ष नाही. याव्यतिरिक्त लोकप्रतिनिधीदेखील रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देत नाहीत. दरम्यान, या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आले आहे; परंतु काहीच कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता पावसाळा वेगाने सुरू झाला आहे. तेव्हा खड्ड्यांचे प्रमाण आणखी वाढण्याऐवजी लवकर येथे रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
...........................................................................