Join us

अकरावीच्या प्रवेशाच्या अद्याप ६० टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण ३ फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण ३ फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या फेऱ्यांत प्रवेश मिळाला नाही किंवा काही कारणाने हुकला अशा विद्यार्थ्यांसाठी आता शिक्षण संचालनालयाकडून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अकरावीच्या आतापर्यंत पार पडलेल्या ३ फेऱ्यांत ५ विभागांतून २ लाख १४ हजार ८०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अकरावीच्या राज्यातील ५ विभागांत ऑनलाईन प्रवेशांसाठी ५ लाख ३३ हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यात अकरावीच्या अद्याप ३ लाख १८ हजार ८६४ जागा म्हणजेच जवळपास ६० टक्के जागा रिक्त आहेत.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रात अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने सुरू आहेत. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या ३ फेऱ्यांनंतर या क्षेत्रातील एकूण रिक्त जागांची परिस्थिती स्पष्ट झाली आहे. अमरावती विभागात आतापर्यंत ७ हजार ०६९ प्रवेश, मुंबईत १ लाख ३० हजार ६५१ प्रवेश, नागपूर विभागात २१ हजार ४२१ प्रवेश, नाशिकमध्ये १२ हजार ४७८ तर पुणे विभागात ४३ हजार १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत.

मुंबईत सर्वात कमी प्रवेश

राज्याच्या या पाच विभागांत उपलब्ध जागांच्या ५० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले आहेत. सर्वाधिक प्रवेश अमरावती आणि नागपूर विभागात झाले आहेत. अमरावती विभागातील निश्चित प्रवेशाची टक्केवारी ६४.७४ टक्के तर नागपूर विभागातील प्रवेशाची टक्केवारी ६६.२९ टक्के इतकी आहे. मुंबईतील प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सगळ्यात कमी म्हणजे ५४.०१ टक्के आहे. ३ फेऱ्यांनंतर एकूण जागांपैकी सर्वाधिक रिक्त जागा या नागपूर विभागात असून त्यांची टक्केवारी ६३.६२ टक्के आहे. पुणे विभागात एकूण उपलब्ध जागांपैकी अद्याप ६१.७६ टक्के जागा रिक्त आहेत.

विशेष फेरीचे आयोजन हे शिक्षण संचालनालयाकडून आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत येऊनही काही कारणास्तव हुकले आहेत अशांसाठी केले आहे. नामांकित महाविद्यालयातील जागा या आधीच फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विशिष्ट महाविद्यालयाचा आग्रह न धरता या फेरीत मागील कट ऑफ पाहून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावेत आणि प्रवेश निश्चित करावेत असा सल्ला शिक्षण अधिकारी आणि तज्ज्ञांनी दिला आहे.

-------

तीन फेऱ्यांनंतर प्रवेशाची स्थिती

विभाग - प्रवेश क्षमता - निश्चित प्रवेश - रिक्त जागा

अमरावती - १५९९०- ७०६९- ८९२१

मुंबई - ३२०५००- १३०६५१- १८९८४९

नागपूर - ५८८७५- २१४२१- ३७४५४

नाशिक - २५३८०- १२४७८- १२९०२

पुणे - ११२९२५- ४३१८७- ६९७३८

एकूण - ५३३६७०- २१४८०६- ३१८८६४