मुंबई : मुंबई विद्यापीठ युद्धपातळीवर निकालाचे काम करत आहे, पण अजूनही विद्यापीठाला सगळ्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात यश आलेले नाही. विद्यापीठाकडून ५ अभ्यासक्रमांचे निकाल बाकीच असल्यामुळे, हे निकाल आता लागणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या झालेल्या सरमिसळीतून विद्यापीठ आता काय मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत ४७२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्येही आयडॉलच्या निकालांमध्ये अधिक गोंधळ झाले आहेत, तर दुसरीकडे विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांमध्येही चुका झाल्या आहेत. निकाल लागूनही विद्यार्थ्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत विद्यापीठाकडे ५० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी आल्या आहेत. त्यामुळे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतरही, पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आणि निकाल हे आव्हान विद्यापीठासमोर असणार आहे.मुंबई विद्यापीठाने शनिवारी रात्री उशिरा एमकॉमच्या तिसºया सत्राचा निकाल जाहीर केला. १ हजार ४७० विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी अजूनही विद्यापीठात सुरू आहे, तसेच काही उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ अशा उत्तरपत्रिकांचा शोध घेत आहे. अर्थातच, रखडलेल्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.मुंबई विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षेनंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर झाले पाहिजेत, पण आता परीक्षा संपून चार महिने उलटूनही, विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत, पण विद्यापीठ विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, यावर ठाम आहे.
मुंबई विद्यापीठाचे अजूनही पाच अभ्यासक्रमांचे निकाल बाकीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:32 AM