मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार अद्याप घडले आहेत. मात्र आता बोल बच्चन टोळीच्या आरोपीने स्वतःला बँकर म्हणवत एका ६३ वर्षीय व्यावसायिकाला लाखो रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मालाड पश्चिमच्या नरसिंग लेन परिसरात स्लाइडिंग विंडोचा व्यवसाय करणारे नाथालाल वाघेला (६३) हे कुटुंबीयासह राहतात. ते २४ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मालाड च्या एसव्ही रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया मध्ये गेले होते. मात्र त्याठिकाणी पार्किंगला जागा नसल्याने त्यांनी रामचंद्र प्लेन परिसरात त्यांची गाडी पार्क केली आणि पायी बँकेत जायला निघाले. तितक्यात एक ४० वर्षाचा इसम त्यांच्याकडे आला आणि मुझे पहचाना की नही असे त्याने वाघेला यांना विचारले. तेव्हा मी तुम्हाला ओळखत नाही असे उत्तर त्यांनी दिले. तेव्हा तो इसम तुम ऐसेही भूल जाते हो, तुम्हे याद नही रहता, मे बँक ऑफ बडोदा मे मॅनेजर हु, असे म्हणाला. मात्र वाघेलांना असा कोणी आठवत नसल्याने अजून एक ३२ वर्षाचा इसम त्याठिकाणी आला आणि वाघेलाना तुम इनको पहचानते नही ये बहोत बडे सहाब है, असे म्हणाला.
तेव्हाही वाघेला यांनी मी तुम्हाला ओळखत नाही मला बँकेत जायला उशीर होतोय असे त्यांना सांगितले. त्यावर एस व्ही रोडला चेकिंग होतेय, तुमच्या गळ्यातली सोन्याची चैन आणि अंगठी तसेच पैसे व्यवस्थित ठेवा असा सल्ला स्वतःला मॅनेजर म्हणणाऱ्या इसमाने त्यांना दिला. ते ऐकून वागेला यांनी गळ्यातली चैन काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती निघाली नाही. म्हणून कथित मॅनेजरने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडचे पैसे तसेच दागिने निळ्या रंगाच्या पर्समध्ये टाकल्यासारखे केले. मला व्यवस्थित बँकेत जाण्यास सांगून ते निघून गेल्यावर वाघेला बँकेत पोहोचले. तिथे त्यांनी निळी पर्स तपासली मात्र त्यात पैसे आणि दागिने नव्हते तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि या विरोधात त्यांनी मालाड पोलिसात गुन्हा दाखल केला.