Join us

बारावीच्या परीक्षेवेळी मुंबईत दोन ठिकाणी गोंधळ

By admin | Published: March 01, 2017 6:16 AM

मुंबईतील दादर आणि मालाड परिसरातील दोन परीक्षा केंद्रे बदलण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांचे पूर्वनियोजन करूनही मुंबईतील दादर आणि मालाड परिसरातील दोन परीक्षा केंद्रे बदलण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला. यंदा विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने पूर्वकल्पना देऊन परीक्षा केंद्रे बदलण्यात आली असल्याने सुरळीतपणे परीक्षा पार पडल्याचे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले. दादरच्या अ‍ॅन्टोनिया डिसिल्व्हा हायस्कूल आणि मालाड येथील मित्तल महाविद्यालय येथील परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली. डिसिल्व्हा शाळेतील परीक्षा केंद्र नाबर गुरुजी शाळा येथे तर, मित्तल महाविद्यालय केंद्र सीजीएस मिशन हायस्कूलमध्ये हलवण्यात आले होते. आधीच्या केंद्रावर जाऊन नंतर पुन्हा या केंद्रावर यायला लागल्याने विद्यार्थी नाराज झाले. बदललेले परीक्षा केंद्र जवळच असल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही. त्याचा कोणताही परिणाम परीक्षेवर झाला नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. बारावीच्या परीक्षेचा पहिला इंग्रजीचा पेपर काही गोंधळ सोडता सुरळीतपणे पार पडला. परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासूनच विद्यार्थी आणि पालकांची गर्दी दिसून आली. शेवटच्या क्षणापर्यंत काही विद्यार्थी अभ्यास करताना दिसले तर काही विद्यार्थी शांत उभे होते. पालकांच्या चेहऱ्यावरी तणाव दिसून येत होता. ११ च्या आधी दहा मिनिटे विद्यार्थ्यांना इंग्रजीचा ुपेपर हाती देण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)।कर्करोगग्रस्त विद्यार्थ्यांनीही दिली परीक्षा काही दिवसांपूर्वीच रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झालेल्या स्नेहा आरी हिनेही लेखनिक न घेता बारावीचा पहिला पेपर स्वत: लिहिला. चौपाटी भवन्स महाविद्यालयातील या विद्यार्थिनीने जिद्दीने अभ्यास करून आजचा पेपर पूर्ण केला. औषधोपचार सुरू असताना सलग तीन तास बसता येत नसतानाही तिने आजचा पेपर पूर्ण केला. स्नेहाबरोबरच अन्य दोन कर्करोगग्रस्त विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.