लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अपुरे बेड, ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटर खाटांची अनुपलब्धता, रक्तटंचाई अशा अनेक समस्यांमुळे सध्या कोरोनाविरोधातील लढाई बिकट होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यास जिवंत परत येऊ की नाही, या भीतीने अनेक जण चाचणी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. मात्र, वेळीच निदान न झाल्याने रुग्ण मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. अशावेळी घाबरून न जाता सकारात्मक विचारांनी कोरोनाला सामोरे गेल्यास या आजारातून पूर्णपणे बरे होता येते, असा सल्ला बेस्ट कर्मचारी रोहिदास भोईलकर यांनी दिला. त्यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे.
भोईलकर हे बेस्टच्या वरळी आगारात चालक म्हणून सेवेस आहेत. ‘कर्तव्यावर असताना दररोज हजारो माणसांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाची लागण होण्याची भीती होती. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेत होतो; पण माझ्यासह पूर्ण कुटुंबाला कोरोनाने गाठलेच. आजूबाजूला भीषण स्थिती असल्याने घाबरून गेलो; पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या धीरामुळे कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचे बळ मिळाले’, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दररोजच्या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाविषयक अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आला की बाधित रुग्ण आत्मविश्वास गमावतो. एखाद्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली की, आपण यातून बरे होणार नाही या विचारानेच अर्धमेला होतो. मनोबल गमावून कोरोनावर मात करणे अशक्य आहे. या लढाईत सकारात्मक विचार, जगण्याची प्रबळ इच्छा आणि शासकीय यंत्रणांची मदत अत्यंत गरजेची आहे. त्याआधारे आपण सहज कोरोनाला हरवू शकतो. शेवटी ‘डर के आगे जीत होती हैं’, असे मत भोईलकर यांनी व्यक्त केले.
* सकारात्मक विचारांनी नकारात्मकतेवर मात
कोरोना उद्रेकामुळे आजूबाजूला नकारात्मक वातावरण आहे. माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली तेव्हा आम्ही सगळेजण प्रचंड घाबरलो होतो. ओळखीतले अनेक जण कोरोनाने दगावल्याच्या बातम्या येत असल्यामुळे नाना तऱ्हेचे विचार मनात येत होते. काही दिवसांनी आमचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. प्रत्यक्षात पालिकेच्या विलगीकरण कक्षात गेल्यानंतर तेथील व्यवस्था, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेला धीर आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोरोनारूपी नकारात्मकतेवर मात केल्याचे भोईलकर यांच्या कन्या सुस्मिता यांनी सांगितले.
* अर्धांगवायूचा त्रास असूनही मानली नाही हार
सुस्मिता भोईलकर यांनी सांगितले की, माझ्या आईला अर्धांगवायूचा त्रास आहे. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा काळजात धस्स झाले. माझाही अहवाल पॉझिटिव्ह येऊ दे, यासाठी मनोमन प्रार्थना केली, जेणेकरून एकाच ठिकाणी विलगीकरणात राहून तिची सेवा करता येईल. माझ्या मनाप्रमाणे घडले. या काळात आईला फार जपावे लागले. या कामात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. आईची विशेष काळजी घेतली. त्यामुळेच अर्धांगवायूचा त्रास असूनही तिने हार न मानता कोरोनावर मात केली.
* घरी राहूनही कोरोनावर मात करणे शक्य
भोईलकर पती-पत्नी आणि मुलगी विलगीकरण केंद्रात दाखल झाले असले तरी त्यांच्या मुलाने गृहविलगीकरणात राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला. शेजारी आणि नातेवाइकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्याला जेवण आणि इतर मदत पुरवली. त्यामुळे तोही सकारात्मक आणि ऊर्जावान राहिला आणि घरी राहून त्याने कोरोनावर मात केली, असे भोईलकर यांनी सांगितले.
...........................