खासगी बेस्ट गाड्या घेण्यास विरोध कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 06:37 AM2018-11-16T06:37:18+5:302018-11-16T06:37:45+5:30
कामगार संघटना भूमिकेवर ठाम : बैठक निष्फळ, बेस्ट प्रशासनाची कोंडी
मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी खाजगी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यासाठी कामगार संघटनेला राजी करण्याचे प्रयत्न बराच काळापासून सुरू आहेत. या खासगीकरणाला बेस्टमधील कामगार संघटनांचा विरोध कायम असल्याने बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली आहे.
सतत वाढणारा इंधनाचा खर्च वाढत असून वाहतूक विभागाचा तोटा वर्षागणिक वाढत आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात बेस्ट प्रशासनाने ७२० कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे बचत करण्यासाठी खासगी बसगाड्या चालविण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच कामगार संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे बेस्टमधील मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांच्यासोबत नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे व बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी शशांक राव यांच्याकडे खासगी बसगाड्या वापरासाठी त्यांच्या कामगार संघटनेने परवानगी द्यावी व न्यायालयातील याचिका मागे घ्यावी असा आग्रह धरला. बस ताफ्यात नवीन एक हजार बसगाड्या घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र शशांक राव यांनी बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे ठणकावले. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.
...यासाठी घ्यावी लागतेय खासगी बस
पालिका प्रशासनाने केलेल्या शिफारशीनुसार बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा तयार केला. त्यानुसार ४५० खाजगी बसगाड्या भाडेतत्त्वावर बेस्ट परिवहन विभागात चालविणे, प्रशासकीय खर्चात कपात करणे, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी करणे आदी आर्थिक सुधारणा कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच बेस्टला आर्थिक मदत देण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविली आहे.