मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा कळीचा बनला आहे. सहा पूल असूनही या पुलांचा प्रवाशांकडून पुरेसा वापर होत नसल्याने ठरावीक तीन पुलांवरची गर्दी वाढत आहे. तीन पुलांवरील गर्दीला उर्वरित तीन पुलांवर वळविणे हे रेल्वे प्रशासनासमोरचे आव्हान आहे.विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. पुलांवरील पत्रे तुटलेले असून, जिने अरुंद आहेत. छपरावरील पत्रे मोडकळीस आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंखे जुने झाले आहेत. दोन स्वयंचलित जिन्यांची गरज असताना एकच स्वयंचलित जिना आहे.दादर रेल्वे स्थानकावरील पुलांसह, पादचारी पुलांवरील फेरीवाले हटवण्यात आले आहेत. यामुळे स्थानकावरील रोज सुमारे ६ ते ७ लाख प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र स्थानकातील अरुंद पुलालादेखील पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. जिन्यांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. पुलांची कनेक्टिव्हिटी नीट नाही.मशीद रेल्वे स्थानक विकासाच्या प्रतीक्षेत आहे. जिने अरुंद आहेत. अरुंद जिने आणि अरुंद पूल हे येथील प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. मशीद रेल्वे स्थानकावर तीन अरुंद पादचारी पूल आहेत. या पुलावरील जिन्यातून केवळ तीन व्यक्ती सहजपणे चढू-उतरू शकतात.सांताक्रुझ येथील गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया पादचारी पुलाची अवस्था बिकट आहे. हा पूल ५० वर्षांपूर्वीचा असल्याने जीर्ण झाला आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. बोरीवली दिशेकडील फलाटावर छप्पर नाही. निवडकच तिकीटखिडक्या उघड्या असल्यामुळे तिकीटघराबाहेरची गर्दी वाढत जाते.सायन रेल्वे स्थानकाचा धारावीकर मोठ्या प्रमाणावर वापर करतात. लोकमान्य टिळक रुग्णालयात रेल्वेने येणारे रुग्णदेखील सायन रेल्वे स्थानकात उतरतात. अरुंद पुलावरून या रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना नातवाइकांची दमछाक होते. अपुरी तिकीटघरे, प्रसाधनगृहांची दुरवस्था अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन पादचारी पूल आहेत, त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा फारच कमी वापर होतो. दक्षिणेकडील पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या पुलावर नेहमी कोंडी होते.
मानखुर्द रेल्वे स्थानकावर येण्यासाठी मानखुर्दमधील आगरवाडी, लल्लूभाई कम्पाउंड, जयहिंदनगर, सोनापूर, साठेनगर, शिवाजीनगर परिसरात राहणारे लोक जीव धोक्यात घालून, रेल्वेमार्गाचा वापर करत रेल्वे स्थानकावर पोहोचतात. या लोकांसाठी स्कायवॉक आणि पूल बांधावा.भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, बाहेर पडल्यावरही अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि घरी जाता जाता या फेरीवाल्यांकडून भाज्या, फळे विकत घेणाºया चाकरमान्यांची भाऊगर्दी; त्यामुळे घाईच्या दोन्ही वेळांमध्ये भांडुप रेल्वे स्थानक किंवा स्थानकातून लाल बहादूर शास्त्री मार्ग गाठताना जीव मेटाकुटीला येतो. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांडुप रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार, याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.वांद्रे या स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. अरुंद पूल येथील मोठी समस्या असून, येथे सरकते जिनेदेखील नाहीत. गंजलेले पूल, रेल्वेच्या हद्दीत कचºयाचे साम्राज्य, रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्या असे चित्र येथे पाहायला मिळते. या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याने, वांद्रे स्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले असल्याचे प्रवासी सांगतात.लोअर परळ स्थानकावर दोन पूल आहेत. यामध्ये दादर बाजूला असलेल्या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. फलाट क्रमांक २ आणि ३च्या पुलाला पायºया नाहीत. तसेच या स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर चिंचोळ्या गल्ल्या आहेत. तर, पूर्वेला बाहेर पडल्यावर अरुंद पूल आहे. या स्थानकाच्या परिसरात कॉर्पोरेट हाउस वाढल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रोज प्रवाशांना या चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद पुलावरून वाट काढत प्रवास करावा लागतो.