- सीमा महांगडे
मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने पुढील वर्षी आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणेवर मोठा परिणाम होणार आहे. पुढील वर्षी साडेपाच हजार एमबीबीएस इंटर्न व शिकाऊ विद्यार्थ्यांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.राज्यातील सर्व वैद्यकीय व्यवस्था गेल्या मार्चपासून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राबत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉक्टर, निवासी डॉक्टर्स, पदव्युत्तरचे विद्यार्थी सर्वच जण करोना रुग्णांच्या सेवेत गुंतले आहेत. १९ तारखेपासून वैद्यकीयच्या विविध अभ्यासक्रमांचे राज्यातील तब्ब्ल ४० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. सुरक्षा लक्षात घेऊन उचललेले पाऊल योग्य असले तरी पूर्ण बरोबर नाही. परीक्षा ऑनलाइन, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घेऊन त्यांना पुढच्या टर्मसाठी पात्र ठरविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्याने मेपासून त्यांचा पुढील प्रत्यक्ष कामात सहभाग सुरू होईल; मात्र जूनमध्ये परीक्षा झाल्यास विद्यार्थी पुढील संपूर्ण सत्र अडकणार असल्याने मधल्या काळात इंटर्नसची बॅचच तयार होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचा रुग्णसेवेतील सहभागात माेठा गॅप पडेल.केवळ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास जवळपास साडेपाच हजार इंटर्नसचा खड्डा पुढच्या वर्षात पडण्याची भीती पालक प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी बोलून दाखवली.
परीक्षा पुढे ढकलण्याचा घाट का?निरीक्षणानुसार, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्णतेचा टक्का हा केवळ ५ टक्के असतो. सप्लिमेंटरी परीक्षा देऊन एका महिन्यात विद्यार्थी ही परीक्षा पास होतात, मग ही परीक्षा पुढे ढकलण्याचा घाट का? त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे आवश्यक असल्याचे मत शेणॉय यांनी मांडले.
रुग्णसेवेत अडथळा येण्याची भीतीपरीक्षा पुढे ढकलल्याने आता जास्त फरक पडणार नसला तरी शैक्षणिक वर्ष लांबल्याने मनुष्यबळाचा गॅप पडणार आहे, हे निश्चित आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे.- ज्ञानेश्वर पाटील, अध्यक्ष , केंद्रीय मार्ड संघटना