राज्यात कुशल कामगारांची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:34 PM2020-08-08T18:34:13+5:302020-08-08T18:34:37+5:30
जाहिरातीनंतरही कंत्राटदारांना अल्प प्रतिसाद; अंगमेहनतीच्या कामांसाठी तयारी नसल्याचे निरीक्षण
मुंबई : कोरोनाच्या संकटाला घाबरून परप्रांतीय श्रमिकांनी घर वापसी सुरू केल्यानंतर स्थानिक तरूणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल असे चित्र उभे करण्यात आले होते. मात्र, राज्यात कुशल कामगारांची वानवा असून अंगमेहनत करण्याची राज्यातल्या तरुणांची तयारी नसल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आल्याची माहिती एमएमआरडीएतल्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. आम्ही कंत्राटदारांकडील १६ हजार जागांसाठी एमएमआरडीएने जाहिराती काढल्या. मात्र, जमेतेम तीन हजार मजूर त्यातून मिळाले असून निम्म्यापेक्षा जास्त भरणा परप्रांतीयांच असल्याचे सांगण्यात आले.
श्रमिकांच्या घर वापसीमुळे एमएमआरडीएच्या प्रकल्पांच्या कामांचा खोळंबा सुरू होता. सरकारने ही कामे सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर एमएमआरडीएने जून महिन्याच्या उत्तरार्धात १६ हजार कुशल अकुशल कामगारांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यात गवंडी (२४७), सुतारकाम (२,६७८), फिटर (३३५९) , वेल्डर (४२३), वायरमन (२१६७) या कुशल कामगारांसह ७ हजार ४४९ जागा एमएमआरडीएला भरायच्या होत्या. राज्यातील तरुण बेरोजगारांना या रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार जाहिराती प्रसिध्द करून संपर्कासाठी फोन नंबही देण्यात आले होते. या जाहिरातींना प्रतिसाद देत राज्यातील श्रमिक दाखल झाल्यानंतर त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचेही नियोजन होते. मात्र, अपु-या प्रतिसादामुळे या मोहिमेवर पाणी फेरले गेले आहे.
दरवर्षी मे ते जुलै या तीन महिन्यांत मुंबईतले अनेक श्रमीक शेतीच्या कामांसाठी गावी जातात. यंदा कोरोनामुळे ते प्रमाण कैकपटीने वाढले असून त्यांच्या परतीचे प्रमाणाही नगण्य आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या कंत्राटदारांना आजही जेमतेम ५० टक्के मजूरांच्या जोरावर काम करवे लागत आहे. कुशल आणि अकुशल श्रमिकांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात दिल्यानंतर हजारो फोन आले. मात्र, त्यात महाराष्ट्रातील पदवी, डिप्लोमाधाकर आणि शिक्षित तरूणांचाच भरणा जास्त होता. अंगमेहनतीच्या कामाची तयारी असलेले तरुण त्यात नव्हते. तसेच, या कामांसाठी आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त असलेले तरुणांचीही वानवा होती असी अशी माहिती या अधिका-यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. जेमतेम तीन ते साडे तीन हजारांच्या आसपास श्रमिक या प्रक्रियेतून आले असून त्यात परप्रांतीयांचाही भरणा आहे. कोरोनामुळे चिघळलेली मुंबईतली परिस्थिती हेसुध्दा स्थानिकांच्या अल्प प्रतिसादाचे एक कारण असू शकते असेही या अधिका-यांचे म्हणणे आहे.
………………………
परप्रांतियांच्या पुनरागमानामुळे संधी हूकली
परप्रांतिय श्रमिकांच्या घर वापसीमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधीचे सोने राज्यातील तरूणांना करता आलेले नाही. आता मुंबईतील कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर परप्रांतिय मजूर मुंबई आणि सभोवतालच्या शहरांमध्ये दाखल व्हायला लागले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडील मजूरांच्या संख्येतही हळूहळू वाढ होताना दिसत असून स्थानिक तरूणांची संधी कमी होत जाणार आहे.
………………………
जागृतीचा परिणाम होईल
राज्यातील तरुणांच्या भरतीसाठी घेतलेले विशेष वेबिनार यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते. रोजगार, स्वयंरोजगार , कौशल्य विकास हे विभाग या भरतीसाठी प्रयत्नही करत होते. परंतु, प्रत्यक्ष या मोहिमेला प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. मात्र, या निमित्ताने मुंबईत अशा स्वरुपाच्या कामे मिळू शकतात हे राज्यातील तरुणांपर्यंत कळले. त्यादृष्टीने ते तयारी करतील ही आशाही अधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.