लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करीत आहे. मात्र, हा तपास एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व काही बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.
राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करीत आहे. यंत्रणा कुणाची मक्तेदारी नसते. सरकारे येतात, जातात. यंत्रणा आहे तिथेच असतात. यंत्रणांवर विश्वास असावा लागतो. तुमच्या काळात ज्या यंत्रणा होत्या त्याच आताही आहेत. मग, आताच अविश्वास का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधकांकडून ऊठसूट महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. राज्यातील यंत्रणांवर अविश्वास दाखवला जात आहे. सर्व काही केंद्र सरकारच्याच हाती आहे, असे विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी इंधन दरवाढीचा विषयही केंद्राकडेच द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी या वेळी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरूनही भाजपवर निशाणा साधला. जे लोक काल सत्तेत होते, मुख्यमंत्री होते त्यांना राज्याच्या यंत्रणांवर विश्वास नाही. दुसरीकडे डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र मला भेटून राज्याच्या यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. डेलकर यांनी त्यांच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आत्महत्या करावी हे त्या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये काही लोकांचा उल्लेख आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येईल. या प्रकरणातील दाेषी कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा देणारच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
* किमान या तपासात दिरंगाई नको : गृहमंत्री अनिल देशमुख
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली संशयित कार सापडल्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने करत होते, असे सांगतानाच या तपासात दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. एनआयएकडे तपास वर्ग केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह मृत्यूचा तपासही अशाच पद्धतीने सीबीआयने घेतला होता. याचे पुढे काय झाले, सुशांतसिंहची आत्महत्या होती की हत्या याचा तपास अजून लागलेला नाही. पण, या तपासात दिंरगाई होऊ नये अशी आशा आहे. स्फोटकांचा तपास एनआयएकडे गेला असला तरी मनसुख हिरेन यांच्या आत्महत्येचा तपास राज्य एटीएस करत राहील, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
.......................................................