...तर राज्यातील शाळा सुरू होतील; टास्क फोर्स सकारात्मक, हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 08:17 AM2021-08-29T08:17:27+5:302021-08-29T08:17:51+5:30
पहिलीपासून सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव शाळांमध्ये होऊ नये यासाठीची सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्यास हरकत नाही, असे मत चाईल्ड टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी व्यक्त केले आहे.
पहिलीपासून सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. शुक्रवारी दिल्लीतील शाळा सुरू करण्याच्या निर्णयांनंतर महाराष्ट्रातीलही शाळा सुरु कराव्यात या मागणीलाही जोर आला आहे. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्यायला हवे असे मत अनेक शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
शाळा बंद असल्याने मुलांच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकासावर दीर्घकालीन परिणाम होत चालला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय शासन आणि शिक्षण विभागाने लवकर घ्यायल हवा अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केलेल्या सर्वेक्षणात ८१ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास होकार दिला होता.
शाळा सुरू करण्याचा आणि मुलांच्या लसीकरणाचा संबंध जोडता येणार नाही. हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत, त्यामुळे शाळांमध्ये कोविड संदर्भात काळजी घेण्यासंदर्भात योग्य सूचना आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असून त्यांनतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेता येईल.
- डॉ. समीर दलवाई, चाईल्ड टास्क फोर्स