प्रसूतीगृह आहे; सेवांचा बोजवारा

By admin | Published: October 12, 2015 05:03 AM2015-10-12T05:03:50+5:302015-10-12T05:03:50+5:30

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मुंबई महापालिकेने २०१४ साली मोठा गाजावाजा करत जुन्या दवाखान्याचे नव्या प्रसूतीगृहात नूतनीकरण केले.

There is a dormitory; Deletion of services | प्रसूतीगृह आहे; सेवांचा बोजवारा

प्रसूतीगृह आहे; सेवांचा बोजवारा

Next

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मुंबई महापालिकेने २०१४ साली मोठा गाजावाजा करत जुन्या दवाखान्याचे नव्या प्रसूतीगृहात नूतनीकरण केले. परंतु नव्या प्रसूतीगृहात आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग आणि आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दुरुस्तीच्या कारणात्सव येथील भाभा रुग्णालयातील काही सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असताना बैलबाजारातील प्रसूतीगृहातील सेवा वाढविण्यावर भर देणे आवश्यक होते. मात्र सेवा पुरविण्यात येत नसल्याने या प्रसूतीगृहाची स्थिती ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
कुर्ला पश्चिमेकडे ख्रिश्चन गाव, नवपाडा, सुंदरबाग, काजुपाडा, जरीमरी, बैलबाजार, संदेश नगर, क्रांतीनगर, वाडिया इस्टेट, सोनापूर लेन आणि कमानी असा मोठा रहिवासी परिसर आहे. या परिसराची व्याप्ती मोठी असून, येथे लाखांवर लोकसंख्या आहे. या सर्व लोकसंख्येला आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी बैलबाजार पोलीस चौकीसमोर महापालिकेचा दवाखाना आहे. परंतु, मध्यंतरी दवाखान्याची अवस्था जर्जर झाली. दवाखान्याची इमारत नादुरुस्त झाली होती. दवाखान्यांत पुरवल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचे प्रमाण कमी होते. महत्त्वाचे म्हणजे दवाखान्याच्या दुरुस्तीहून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकारण रंगले होते. परिणामी, दवाखान्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम होता.
सरतेशेवटी अखेर २०१४ साली राज्यात आमदारकीच्या निवडणुका लागल्या आणि जणूकाही कामाचा सपाटा दाखविण्यासाठी दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दवाखान्याची दुरुस्ती करता यावी किंवा दवाखान्याचे नूतनीकरण करता यावे; यासाठी येथे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली. रंगलेल्या राजकारणात काँग्रेसने बाजी मारत दवाखान्याच्या नूतनीकरणाचा विडा उचलला.
दवाखान्याचे काम वेगाने सुरू झाले आणि जुन्या दवाखान्याजागी डोळ्यांत भरेल, अशी तीन मजली प्रसूतीगृहाची इमारत उभी
राहिली.
आजघडीला नव्या प्रसूतीगृहात सेवा नाहीत, असे नाही. परंतु ज्या आहेत; त्या पुरेशा नाहीत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून कुर्ला पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळील भाभा रुग्णालयाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे येथील काही सेवा बंद करण्यात आल्या आहेत. येथील सेवा बंद करताना त्या सेवा बैलबाजार प्रसूतीगृहात सुरू करता येणे शक्य होते. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय टाळता आली असती. (प्रतिनिधी)
२०१४ साली जेव्हा दवाखान्याचे नूतनीकरण करण्यात आले. तेव्हा प्रसूतिगृहावर ‘बैलबाजार प्रसूतिगृह, दवाखाना व आरोग्य केंद्र’ असा नामफलक होता. कित्येक वर्षे हा नामफलक असाच राहिला. गेल्या काही दिवसांत ‘लोकमत’ने येथील प्रश्नांची दखल घेतल्यानंतर हा नामफलक तातडीने बदलण्यात आला.
च्सध्या नूतनीकरण झालेल्या इमारतीवर ‘डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह, दवाखाना व केंद्र’ असा नामफलक आहे. महत्त्वाचे म्हणजे जो नामफलक लावण्यात आहे, त्यावर ‘प्रसूती’ हा शब्द ‘प्रसृती’ असा लिहिण्यात आला आहे. नामफलक लावण्याची घाई सेवा देण्यासाठी का करण्यात येत नाही, असा सवालही रुग्ण उपस्थित करीत आहेत.

Web Title: There is a dormitory; Deletion of services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.