मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. टेक्सटाईल व अन्नप्रक्रिया उद्योगात ४० टक्के रोजगार उपलब्ध आहे. मात्र श्रमप्रतिष्ठेअभावी युवक या रोजगाराकडे वळत नाहीत, अशी खंत या उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली.गुंतवणूक परिषदेतील दुसºया सत्रात मंगळवारी ‘टेक्सटाईल आणि अन्नप्रक्रिया उद्योग व रोजगाराच्या संधी’ यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. रेमंडचे गौतम सिंघानिया, गोदरेज नेचर बास्केटच्या अवनी दवडा, ट्रेंट हायपर मार्केटचे जमशेद डाबू, क्रफ्ट हेंन्जचे संकल्प पोटभरे आणि अल्फा लेवलचे लार्स डिथ्मेर यांनी आपले विचार मांडले.जागतिक ब्रँडची चर्चा करताना आपली उत्पादने जागतिक दर्जाची होतील का, याचा विचार व्हायला हवा, असे सिंघानिया म्हणाले. जगात कुठेही ६० आणि ७० हजारांचा शर्टपिस वापरला जात नाही. भारतात मात्र याहून मोठ्या किमतीचे कापड उपलब्ध आहे.जागतिक बाजारात आरोग्याला उपकारक खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे, असे सांगून ही वाढती मागणी लक्षात घेत आपल्याकडच्या मका, राजगिरा अशा आरोग्यवर्धक पदार्थांचे ब्रँडिंग करायला हवे, असेही डाबू म्हणाले.तर, स्टार्ट अपमुळे अनेक नोकरदार उद्योगधंद्यात उडी घेत आहेत. त्यांच्या संकल्पनांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे नव्या उद्योगांना, स्टार्ट अपला व्यासपीठ मिळेल, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळेल यासाठी समाज आणि सरकारने एकत्रित प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा अवनी दवडा यांनी व्यक्त केली.
रोजगार आहेच, हवीय श्रमप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:39 AM