Join us

तेथे ‘कर’ जुळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:39 PM

कर भरायचा म्हणजे अनेक जण टाळाटाळ करतात. कायद्यातील वाटांना पळवाटा शोधतात. अशा करचुकव्यांना शोधून कारवाईचा बडगा उगारणारे, त्यांच्यात वचक निर्माण करणारे धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणजे मुंबईतील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात (सीजीएसटी) अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या मनप्रीत अरोरा. जीएसटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी देशातील पहिला गुन्हा दाखल करून पहिली अटक करण्याचे श्रेय त्यांना जाते.

- खलील गिरकरमनप्रीत अरोरा यांच्या कुटुंबाला प्रशासकीय अधिकाºयांचा वारसा लाभला आहे. वडील रिझर्व्ह बँकेत महाव्यवस्थापक होते, तीन काका, एक आत्या, चुलत भाऊ केंद्रीय सेवेत अधिकारी आहेत. शिक्षण, संस्कार, शिस्तीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. दुर्गा म्हणून ओळखल्या जाणाºया देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या कार्याचा प्रभाव असलेल्या मनप्रीत यांनी गांधी, बेदी यांच्याप्रमाणे काम करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) त्या रुजू झाल्या.

१९९८ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी असलेल्या मनप्रीत यांनी जयपूर, दिल्ली, अहमदाबादमध्येही काम केले आहे. देशात जीएसटी कायदा लागू होऊन जुलैमध्ये वर्ष झाले. वर्षभरात देशात सुमारे २८०० ते ३००० कोटींची करचुकवेगिरी झाल्याचे उघडकीस आले. मनप्रीत यांनी मुंबई मध्य आयुक्तालयात तब्बल ११०० कोटींपेक्षा जास्त रकमेची करचोरी उघडकीस आणली. जीएसटी कायदा भंग केल्याचा देशातील पहिला गुन्हा दाखल करून पहिली अटक करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. राष्ट्रनिर्माणासाठी कर भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा संस्कार आहे, तो प्रत्येकाने आचरणात आणायलाच हवा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी तिच्याकडे अधिकारी म्हणून पाहण्यापूर्वी महिला म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळेच महिलांना प्रत्येक पदावर सातत्याने स्वत:ला सिद्ध करावे लागते. त्यासाठीच महिलांनी आपल्या कामातून सर्वांनाच स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडायला हवे, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठांनी दिलेले कामाचे स्वातंत्र्य, घरच्यांचा पाठिंबा यामुळेच चांगल्या प्रकारे काम करू शकत आहे, अशी कृतार्थ भावनाही त्यांनी व्यक्त केली.मनप्रीत यांचे खंबीर नेतृत्व, प्रभावी व्यक्तिमत्त्व, ध्येयपूर्तीसाठीचे झपाटलेपण आणि त्यासाठी झोकून काम करण्याची तयारी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ती पाहिल्यानंतर ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती...’ याची आठवण होते.कुठल्याही कामात यशस्वी व्हायचे तर प्रसंगी जोखीम पत्करायची तयारी हवी. त्या वेळी महिला आहे, असे सांगत माघार घेऊन चालत नाही. उलट महिला सर्वच क्षेत्रांत यशस्वीपणे काम करून कुठलेही आव्हान लीलया पेलू शकतात, हे दाखवून देण्याची हीच तर वेळ असते, संधी असते. गरज असते ती प्रामाणिकपणा, जिद्द, कठोर मेहनत आणि दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाच्या जोरावर मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची.

टॅग्स :नवरात्री