मुंबई आणि परिसरात प्रकल्पांची झाली गर्दी, नागरिकांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:31 PM2023-09-28T13:31:08+5:302023-09-28T13:31:28+5:30
मेट्रो प्रकल्पांचा मोठा आवाका: लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव पुढे आल्याने मुंबईतील प्रकल्पात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. फक्त मुंबईच नव्हे, तर मुंबई परिसरात मेट्रो, उड्डाणपूल, लिंक रोड, पादचारी पूल, भुयारी मार्ग, सागरी सेतू, बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प, पत्रावाला चाळ पुनर्वसन प्रकल्प, आदी असंख्य प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो सारखे प्रकल्प तर गेली अनेक वर्षे सुरू आहेत. याशिवाय आणखी काही प्रकल्प प्रस्तावित आहेत.
मुंबई आणि परिसरात १३ मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. अन्य मार्गांची बांधणी सुरू आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात आरे ते बीकेसी मेट्रो मार्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आणखी किमान दोन ते तीन मेट्रो मार्ग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
काही मेट्रो मार्गांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणी मिळून पूर्व आणि पश्चिम दळण-वळण अधिक सुलभ होईल, तर काही मेट्रो मार्गांमुळे मुंबई- ठाणे, मुंबई- नवी मुंबई, नवी मुंबई-ठाणे जिल्हा जोडला जाणार आहे. सर्व प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च आहे.
एमएमआरडीए, पालिका, एमएसआरडीसी आघाडीवर
प्रकल्प उभारणीत या तीन यंत्रणा आघाडीवर आहेत. एमएमआरडीएचे कार्यक्षेत्र थेट पालघरपर्यंत असल्याने त्यांची प्रकल्पातील आघाडी मोठी आहे. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा सागरी सेतू एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
भारतात जे काही सर्वांत जास्त लांबीचे समुद्रावरील पूल आहेत, त्यापैकी एक असणाऱ्या या सागरी सेतूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा सेतू याचवर्षी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि पालिकेच्या तुलनेत एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मुंबईत फारसा नसला तरी मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग, वर्सोवा -वांद्रे सी लिंक हे प्रकल्प आहेत.
भुयारी मार्गही झाले गरजेचे
उड्डाणपूल बांधले जात आहेत, मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत, तरीही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखी प्रकल्पांची गरज भासत आहे. त्यामुळे भुयारी मार्गांचाही पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ठाणे-घोडबंदर दरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे- बोरवली भुयारी मार्ग बांधला जात आहे. कल्याण-डोंबिवली आणि ऐरोली दरम्यानचे अंतर अवघ्या १५ मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली-कटाई नाका भुयारी मार्गाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.
शिवसेना-भाजपची युती राज्यात पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर उड्डाणपूल बांधण्याचा धडाका लावण्यात आला. त्यावेळी ५२ उड्डाणपूल बांधण्यात आले.
मुंबईतील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेता आता पुन्हा अनेक ठिकाणी नवे उड्डाण पूल बांधले जात आहेत, तर जुन्या झालेल्या काही उड्डाणपुलांची डागडुजी सुरू आहे.
अंधेरीचा गोखले पूल, लोअर परळ पूल, गोराई उत्तन खाडी पूल, वाशी खाडी पूल, या उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत.
गोखले रोड पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे, तर लोअर परळ पुलाच्या काही मार्गिका सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मुलुंड गोरेगाव लिंक रोड आणि चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड या मोठ्या लिंक रोडची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.