मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे प्रमाणही यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर आता निर्माल्यातही मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सावाच्या पहिल्या पाच दिवसात चार लाख ४७ हजार किलो एवढे निर्माल्य संकलित करण्यात आले होते. तर यंदा केवळ एक लाख ३० हजार किलो निर्माल्य जमा झाले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती असो किंवा घरगुती गणेशोत्सव काळात बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या निर्माल्याचे महापालिकेमार्फत विविध ठिकाणी संकलन केले जाते. यासाठी निर्माल्य कलश व निर्माल्य संकलित करणाऱ्या वाहनांची व्यवस्था संपूर्ण मुंबईत केली जाते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत एक लाख ३० हजार ३१ किलो एवढे निर्माल्य संकलन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ हजार किलो एवढे निर्माल्य आर विभागातून (बोरीवली) जमा झाले.
वांद्रे, खार या एच पूर्व विभागात ११ हजार ६०० किलो आणि एफ दक्षिण (लालबाग, परळ) येथे १० हजार किलो एवढे निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. तर याच पाच दिवसांच्या कालावधीदरम्यान सर्वात कमी निर्माल्य संकलन हे ‘बी’ (डोंगरी) १९० किलो, ‘इ’ (भायखळा) ३७० किलो इतके निर्माल्य संकलन झाले आहे. संकलित करण्यात आलेल्या या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. हे खत पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उपयोगात आणले जाते.