Join us

अंत्यसंस्कारासाठी वरळीतील वाहतूक मार्गात झाले मोठे बदल

By मनीषा म्हात्रे | Published: October 11, 2024 10:23 AM

अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या काही भागांतील वाहतुकीत बदल करण्यात आला होता.  अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टाटांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी डॉ. ई. मोझेस मार्ग बंद ठेवला होता. वरळी नाका ते रखांगी चौकापर्यंतचा डॉ. ई. मोझेस मार्ग दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद होता. अंत्यविधीसाठी येणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना या मार्गावर प्रवेश दिला जात नव्हता. वरळी नाका येथून महालक्ष्मीला  जाण्यासाठी ॲनी बेझंट मार्ग, लाला लाजपतराय महाविद्यालय, हाजी अली या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. वरळी नाका येथून जी. एम, भोसले मार्ग, दीपक सिनेमा, सेनापती बापट मार्गावरून रखांगी जंक्शन येथून पुढील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ प्रांगणात रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उद्योजक, टाटा उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी टाटा यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. अनेक वलयांकिती आणि प्रसिद्ध असामी या परिसरात आल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. एक हजारांहून अधिक पोलिसांसह, वाहतूक पोलिस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, शीघ्र कृती दल यांनाही तैनात करण्यात आले होते. याशिवाय, एनसीपीएपासून वरळीपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

 

टॅग्स :रतन टाटाटाटा