बोगस लस घेऊन त्रास झाल्याची एकही तक्रार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:22+5:302021-07-02T04:06:22+5:30
पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोगस लसीकरण झालेल्यांपैकी काहींना त्रास झाल्याच्या तक्रारी पोलिसांना ...
पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोगस लसीकरण झालेल्यांपैकी काहींना त्रास झाल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या असून, त्यानुसार त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे; मात्र याप्रकरणी अद्याप पालिकेकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे पालिकेच्या उपायुक्तांकडून सांगण्यात आले.
बोगस लसीकरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एसआयटी) नेमण्यात आली आहे. त्यानुसार लस घेतलेल्या काही जणांना निव्वळ ग्लुकोज नाही तर अन्य काही केमिकल इंजेक्ट करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी काही लोकांना त्रास झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, त्यांच्या रक्ताचे नमुने हे प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शिवम रुग्णालयात धाड टाकली. ज्यात तीन वायल्स ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यादेखील फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. कांदिवलीत ज्या ३९९ लोकांना लस टोचली गेली त्यातील कोणाला याबाबत त्रास झाला का, याबाबत पालिकेच्या परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांना विचारले. तेव्हा 'आमच्याकडे अद्याप अशा प्रकारची एकही तक्रार आलेली नाही. प्राथमिक अहवाल मी वरिष्ठांकडे सुपूर्द केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत' असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार पुढील अहवालाची प्रतीक्षा आहे.