मास्क, ना सुरक्षा; नालेसफाई करताना कामगारांच्या जीवाला धोका
By जयंत होवाळ | Published: March 30, 2024 08:29 PM2024-03-30T20:29:08+5:302024-03-30T20:29:26+5:30
नालेसफाई करताना कामगारांचा जीव धोक्यात ?
मुंबई : सहार रोड येथील नाल्याची सफाई करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नसल्याचे उघड झाले आहे. नऊ फूट उंचीच्या या नाल्यातील गाळ काढणे त्यामुळे त्यांच्या जीवितासाठी धोकादायक बनले आहे. कोणतीही सुरक्षा नसताना कामगार काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वॉचडॉग या संस्थेने तात्काळ काम थांबवण्यास सांगितले.
सहार रोड येथील नाल्यातुन पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम सुरु आहे. नाल्याची सफाई करणाऱ्या कामगारांना आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवणे आवश्यक असते. जंतू संसर्ग होऊ नये यासाठी हातमोजे , विषारी वायूपासून संरक्षण व्हावे म्हणून मास्क, नाल्यात उतरताना गमबूट आदी साधने देणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी कामगारांना कसलीही साधने दिलेली नाहीत. नाल्यातून गाळ काढला जात असताना कंत्राटदार त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र तो तिथे नव्हता असे फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटो यांनी सांगितले. कामगार धोकादायक परिस्थितीत काम करत असल्याचे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ काम थांबवले, असेही त्यांनी सांगितले.
हा नाला नऊ फूट उंचीचा आहे. चुकून एखादा कामगार त्यात पडला आणि त्याला पोहोता येत नसेल तर त्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी घेणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात फाउंडेशनने पालिकेकडे तक्रार नोंदवली आहे. पावसाळापूर्वी नाल्याच्या सफाईचे कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. नाल्यात पुन्हा कचरा जाऊ नये यासाठी नाल्यावर जाळ्या बसवल्या पाहिजेत. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी सुरक्षा विषयक उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.