महाराष्ट्र - उत्तर प्रदेशात सौहार्द वाढणे गरजेचे : योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:59 AM2023-01-06T09:59:52+5:302023-01-06T10:01:00+5:30
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मुंबईत विजय दर्डा यांच्याशी चर्चा
मुंबई : लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या हिताशी जोडलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुंबई व महाराष्ट्रातील उद्योजकांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करावी, याचे आमंत्रण देण्यासाठी योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
यावेळी योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचा विकास कसा साधला जात आहे, याची माहिती दर्डा यांना दिली. उत्तर प्रदेशात ऊर्जा, कृषी, रस्ते विकास, हायवे निर्माण, विमानतळ बांधणी, पाणी व्यवस्था या क्षेत्रांत झालेला विकास आणि त्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने उचललेली पावले याची माहिती दर्डा यांना दिली.
यंदा लोकमत समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य ‘बाबूजी’ यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने दर्डा यांनी योगी आदित्यनाथ यांना स्व. जवाहरलाल दर्डा यांचा अर्धाकृती संगमरवरी पुतळा भेट दिला. तसेच, येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’तर्फे दिल्लीमध्ये
‘लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड’ होणार आहेत, त्याचे निमंत्रण योगी आदित्यनाथ यांना विजय दर्डा यांनी दिले. दरम्यान, दर्डा यांनी योगी यांच्यासोबत घेतलेल्या भेटीदरम्यान उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री नंद गोपाल गुप्ता आणि मुद्रांक खात्याचे राज्यमंत्री रवीन्द्र जयस्वाल हेदेखील उपस्थित होते.
संकुचित मानसिकतेवर आमचा विश्वास नाही
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये सद्भावना वाढीस लागतानाच दोन्ही राज्यांमध्ये सहयोगाचे बंधदेखील वृद्धिंगत होणे गरजेचे आहेत. कोण महाराष्ट्राचा आहे किंवा कोण उत्तर प्रदेशचा आहे अशा संकुचित मानसिकतेवर आमचा विश्वास नाही, तर प्रत्येकाकडे आपण भारतीय नागरिक म्हणून पाहतो. तसेच, जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न असतो त्यावेळी पक्षाच्या भूमिकेतून न पाहता देशाचे हित सर्वोच्च आहे, हा विचार केंद्रस्थानी राहतो. राष्ट्रहितासंदर्भात कोणताही मतभेद होणार नाही’. महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
महामारीच्या काळात यूपीचे काम सर्वोत्तम
विजय दर्डा म्हणाले की, उत्तर प्रदेशात मंदिर पर्यटन मोठ्या प्रमाणावर झाले असून २०२२ मध्ये अतिशय कमी कालावधीत मंदिर पर्यटनाच्या माध्यमातून जो महसूल मिळाला, तो थक्क करणारा आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारामुळे हे शक्य झाले आहे. तसेच, कोरोना महासाथीचा सामना ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकारने केला त्याने आपण प्रभावित झालो. महामारीदरम्यान देशात उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य होते जिथे उद्योग-व्यवसाय सुरू होता. तसेच, अन्य राज्यांतून उत्तर प्रदेशात आलेल्या लोकांनादेखील अन्न, निवारा व रोजगार त्या सरकारने दिल्या,
ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचे दर्डा म्हणाले.