यंदाही पावसाळ्यामध्ये ‘तुंबई’! ८६ ठिकाणी पाणी साचणार; पूरप्रवण क्षेत्रातही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:05 IST2025-04-23T10:05:07+5:302025-04-23T10:05:32+5:30
मुंबईत यंदा ८६ ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसरात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदाही पावसाळ्यामध्ये ‘तुंबई’! ८६ ठिकाणी पाणी साचणार; पूरप्रवण क्षेत्रातही वाढ
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, यासाठी संबंधित ठिकाणी उपाययोजना करत अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. असे असतानाही पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या संख्येत मात्र वाढच होताना दिसत आहे. गेल्यावर्षी अशी ६० ठिकाणे होती, यंदा ही संख्या ८६ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या ३८६ वरून ४५३ इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबईत ३८६ पूरप्रवण क्षेत्रे आढळली होती. त्यापैकी ३२६ पूरप्रवण क्षेत्रांमधील पूरपरिस्थितीवर महापालिकेने नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर उर्वरित ६० पूरप्रवण क्षेत्रांचे महापालिका व इतर संस्थांनी निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा दावा केला होता. परंतु, यावर्षी एकूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या ४५३ झाली असून, त्यापैकी ३६९ पूरप्रवण क्षेत्र नियंत्रणात आणल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे मुंबईत यंदा ८६ ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसरात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रत्येक पावसाळ्यात नवीन ठिकाणे जलमय
मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचण्याची नवीन ठिकाणे तयार होतात. तेथे प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर त्यावर तत्काळ किंवा दीर्घ उपाययोजना कराव्या लागतात. ज्यामध्ये कधी पर्जन्य जलवाहिनीचा अंतर्गत भागात गाळ किंवा अन्य काही साचून त्यातील प्रवाह खंडित होण्यासारखे प्रकार घडतात.
परिणामी अशा प्रकरणांमध्ये पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत करून ते ठिकाण पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यायोग्य केला जाते, अशी माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘मिलन सब वे’त पाणी नाही
पाणी साचण्याची ठिकाणे वाढत असली तरी प्रत्यक्षात पाण्याचा निचरा करण्याचे प्रमाणही वाढत आहे. पूर्वी जेथे काही तास पावसाचे पाणी साचायचे, तेथे हे प्रमाण आता काही मिनिटांवर आले आहे. मिलन सब वेमध्ये मागील दोन वर्षांमध्ये पाणी साचले नसल्याचा दावाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.
३० ठिकाणांवर नियंत्रण अशक्य
पालिका उपाययोजना करीत असली तरी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, रेल्वे आदींकडून योग्य प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने ३० ठिकाणांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येणार नाही. तसेच झोपडपट्टी भागांमध्येही अशी ठिकाणी निर्माण होत असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.