मुंबईत ७४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, ४६ ठिकाणे अतिधोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:26 AM2023-07-28T08:26:14+5:302023-07-28T08:26:29+5:30
मुंबईत दरडप्रवण ७४ ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मुंबईत दरडप्रवण ७४ ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या साहाय्याने हे सर्वेक्षण करण्यात आले असून या दरडींच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेखी निवेदनातून ही माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे असलेल्या विभागातून माहिती एकत्र करून २०१७ मध्ये पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण २९९ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यात आली.
२०१८ मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने २९९ पैकी २४९ संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याचे चार उपप्रकारांत विभाजन केले. यामध्ये ४६ ठिकाणे अतिधोकादायक, २८ ठिकाणे मध्यम धोकादायक, ४० ठिकाणे कमी धोकादायक व १३५ ठिकाणे धोका नसल्याचे निश्चित करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेची तयारी
मुंबईत २४ तासांत २०० किंवा २५० मिमी पाऊस झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने दरडी कोसळणाऱ्या संभाव्य ठिकाणांच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय करू नये, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याची पद्धतीबाबत आपत्कालीन विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येते.
यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या साहाय्याकरिता अंधेरी क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या व पूर्व उपनगरासाठी विक्रोळी व कांजूरमार्ग या ठिकाणी दोन जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या उपाययोजना
दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासोबत सांडपाणी सुविधा, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, नवीन झाडांची लागवड, नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर, जनजागृती व प्रशिक्षण अशा उपाययोजना सुचविण्यात आल्याचे सरकारने सांगितले.