मुंबई :मुंबईत तूर्तास कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. सत्ताधारी पक्षातर्फे उपस्थित करण्यात आलेल्या मुंबईवरील चर्चेला उत्तर देताना विविध प्रश्नांचा त्यांनी आढावा घेतला.
मुंबईत १५ वर्षांत ३५०० हजार कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी खर्च झाले. त्यामुळे आम्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला, तसे महापालिका आयुक्तांना आदेश दिले. पहिल्या टप्प्यात ६ हजार कोटी रुपयांचे रस्ते करतोय, दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल, असे मुख्यमंत्री याबाबत बोलताना म्हणाले.
मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार :
गिरणी कामगारांना १५ हजार घरांचे वाटप केले आहे, ९० हजार घरे अजून हवी आहेत. त्याचे वाटपही आम्ही पूर्ण करणार हा आमचा शब्द आहे. धारावीत अपात्र आहेत त्यांनाही घरे देणार असा निर्णय आम्ही घेतला आहे, रखडलेल्या जुन्या गृहप्रकल्पांचा पुनर्विकास करणार आणि मुंबईच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
५ मार्चपर्यंत पाणी कपात कायम :
१) कपातीचे संकट टाळले असले तरी पिसे येथील ट्रान्स्फार्मर दुरुस्त करण्याची कामे सुरू असल्याने पाच मार्चपर्यंत असलेली १५ टक्के पाणी कपात कायम राहणार आहे.
२) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून गेल्या तीन वर्षांतील निचांक आहे.
३) अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि सुलाशी या धरण-तलावात ६ लाख २४ हजार ६२७ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
४) भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी पालिकेची मागणी होती.