- स्नेहा मोरे मुंबई : कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरीही सध्या राज्यात तब्बल १६ हजार ९० कुष्ठरोग उपचाराधीन आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दर दहा हजारी कुष्ठप्रमाण १.२६ टक्के इतके आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे १ हजार ३३१, पालघरमध्ये १ हजार २०६ रुग्णांची नोंद आहे, तर सर्वात कमी रुग्ण सिंधुदुर्ग ३८ आहेत.
कुष्ठरोग म्हणजे ?मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार म्हणजे कुष्ठरोग होय. या रोगात प्रामुख्याने त्वचा व मज्जातंतूवर विपरित परिणाम होतो. या रोगाची वाढ अत्यंत हळूवार होते, तसेच या रोगात स्नायू, डोळे, हाडे, वृपण आणि अंतर्गत अवयवांवर देखील विपरित परिणाम होतात. कुष्ठरुग्णांना समाजात सन्मान मिळावा, यासाठी शासन योजनांची अंमलबजावणी करीत असला तरी, आजही त्यांचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. अशा स्थितीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासन राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबवित आहेत. या मोहिमेत आढळून आलेल्या कुष्ठरुग्णांवर औषधोपचार करून त्यांच्याबाबत असलेले न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.प्रतिबंधात्मक औषधोपचार नव्याने निदान केलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांना किंवा कुटुंबीयांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना रिफॅम्सीन या औषधाची एक मात्रा दिली जाते. या औषधांमुळे कुष्ठरोगाचा संसर्ग होणे टाळता येते. कुष्ठरोगाबाबतच्या लक्षणांची योग्य माहिती, औषधोपचार, सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार हे या आजारापासून बचावाचे उत्तम मार्ग आहेत. तेव्हा कुष्ठरुग्णांना घरातून वेगळे किंवा अलिप्त ठेवण्याची आवश्यकता नाही. कुटुंबीयांसोबतच राहून पूर्ण औषधोपचार घेऊन या आजारातून मुक्त होणे शक्य आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ‘कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. यंदा ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत राज्यात कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या आजाराविषयी समाजामध्ये जागरुकता व शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे कुष्ठरुग्णांविषयी होणारा भेदभाव दूर करणे हा अभियानाचा उद्देश आहे.