Join us

बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:30 AM

निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य आहे.

मुंबई :

निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य आहे. प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनाही ते मान्य आहे. तेव्हा तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मते देतात, आमची आमने-सामने येण्याची तयारी आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल करीत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिंदे गटाला आव्हान दिले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. खोक्यांनी गद्दार विकले जातात; पण शिवसैनिकांचे हे जे चैतन्य आहे ते विकत घेतले जाऊ शकत नाही. ज्यांना  जिकडे जायचेय त्यांनी जावे, जाऊन तिकडेच झोपावे, उठूच नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावताय, हे चांगले आहे; पण तुमचा हेतू वाईट आहे. ज्या कलाकाराने चित्र चितारले त्याला पुरेसा वेळ दिला गेलेला नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कोश्यारींना हाकलून द्यायला हवं होतं’भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फार लवकर त्यांना शहाणपण सुचलं; पण अशा महाराष्ट्रद्वेष्ट्यांना खरंतर हाकलून द्यायला हवं होतं, अशी टीका त्यांनी केली.

पालिकेच्या ठेवींवर डल्ला मारण्याचा डाव  बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असे मोदी म्हणाले. ते भयंकर आहे.   मुंबई महापालिकेच्या एफडी म्हणजे काय तर ज्यावेळी महापालिकेची परिस्थिती वाईट होती ती सुधारण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांच्या काळात लोकप्रतिनिधींनी तो निर्णय घेतला. त्यांनी मेहनत घेतली म्हणून या ठेवी झाल्या.   स्वत:च्या खर्चाने कोस्टल रोडसारखा प्रकल्प हाती घेणारी मुंबई महापालिका एकमेव आहे. या ठेवीतून असे प्रकल्प राबविले जात आहेत.   त्या ठेवींतील ३० ते ४० टक्के ही कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, गॅच्युएटी यासाठीची तरतूद आहे.   पण या ठेवींवर डल्ला टाकायचा यांचा डाव आहे. त्यांना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते; पण आमच्यासाठी ती मातृभूमी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरे