मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना लावलेली निवडणूक बीएलओची ड्युटी स्वीकारण्याची कोणतीही सक्ती नाही अशी स्पष्टोक्ती आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला हक्काची उन्हाळी सुट्टी मिळणारच असे त्यांनी तत्वतः मान्य करून तसे निर्देश दिले आहेत.
उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालय वांद्रे पूर्व येथे आज दुपारी शिवसेना मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे व शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी डॉ.राजेंद्र भोसले व उपजिल्हाधिकारी निवडणूक तेजस समेळ यांची भेट घेतली. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना बी एल ओ निवडणूक ड्युटी बजावण्यात आली आहे, ती रद्द करावी आणि उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर दि,15 जून पासून ही निवडणूक ड्युटी लावावी असे निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या उन्हाळी सुट्टीत त्यांनी बाहेरगावी लग्न समारंभ आणि आपल्या गावी,कुटुंबा समवेत बाहेर जाण्यासाठी आधीच नियोजन करून तिकीटे सुद्धा काढली आहेत.त्यांना नवीन शैक्षणिक वर्षात रिफ्रेश होण्यासाठी उन्हाळी सुट्टी महत्वाची असल्याचे आमदार सुर्वे आणि शेंडगे यांनी उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना पटवून दिले.
यासंदर्भात डॉ. राजेंद्र भोसले व उपजिल्हाधिकारी निवडणूक तेजस समय यांनी सदर तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.त्यानुसार सर्व विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ फोन व मोबाईल वरून बी. एल. ओ. ड्युटी स्वीकारण्याची कोणाही शिक्षकांवर सक्ती करू नका असे तोंडी निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शिक्षकांनी क्सि,15 जून पासून ही निवडणूक कर्तव्याची बी एल ओ ड्युटी स्वीकारावी ज्या विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांना हे निर्देश मिळाले नाहीत किंवा राहून गेले व जेथे निवडणूक कर्तव्य स्वीकारण्यास हे शिक्षक गेले असतील ड्युटी स्वीकारले असेल त्या शिक्षकांनी त्वरित दि,2 में ते दि,14 जून उन्हाळी सुट्टी मिळावी असा लेखी अर्ज जिल्हा अधिकाऱ्यांच्या नावाने करावा त्यांची त्वरित सुट्टी मंजूर केली जाईल. काही अडचण आल्यास किंवा कोणीही विधानसभा निवडणूक अधिकारी सक्ती करत असल्यास शिक्षकांनी शिवाजी शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे