CoronaVirus: 'मास्कसक्ती'वर तूर्तास निर्णय नाही; सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, राजेश टोपेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 10:24 PM2022-04-28T22:24:18+5:302022-04-28T22:25:15+5:30
टास्क फोर्सनेही पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारला दिली होती.
मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. तसेच टास्क फोर्सनेही पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारला दिली होती.
दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली. मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.
टाक्स फोर्सच्या या सूचनेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कसक्तीबाबत माहिती दिली. आजच्या बैठकीत कोरोना महासाथीवर चर्चा करण्यात आली. सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे, असं त्यांनी सांगितलं.
तूर्तास मास्क वापराच्या सक्तीवर निर्णय झालेला नाही. तसेच मास्कचा वापर न केल्यास दंडही ठोठावण्यात येणार नाही. मात्र नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
पुढचा व्हेरिअंट कोणता असेल? -
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा पुढचा व्हेरिअंट कोणता असेल, हे सांगणे अवघड आहे. आमच्यासाठी हा एक चिंतेचा विषय आहे. आता आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्लॅन तयार करायला हवा. आपल्याकडे जीव वाचवू शकेल असे तत्रज्ञान आहे. मात्र, त्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तरी लस हेच या आजारावरील रामबान औषध आहे.