बदली होऊनही कार्यमुक्ती नाही; वरिष्ठांचा त्रासाला कंटाळून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:27 AM2023-05-31T02:27:47+5:302023-05-31T02:28:06+5:30
घाटकोपर पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
मुंबई : पुण्याला बदली होऊन महिना उलटत आला तरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कार्यमुक्त करीत नसल्याच्या तणावातून सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर यांनी पोलिस ठाण्यातच फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. घाटकोपर पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने त्यांना वेळीच रुग्णालयात हलविल्याने ते थोडक्यात बचावले.
घाटकोपर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नाणेकर यांची पुण्यात बदली झाली आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके त्यांना कार्यमुक्त करीत नव्हते. त्यामुळे राहण्याच्या व्यवस्थेसह मुलांचे शाळेत प्रवेश घेण्यासाठी उशीर होत होता. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात गेले. कार्यमुक्त करण्यावरून पुन्हा वाद झाला. मात्र, पदरी निराशाच पडल्याने, त्यांनी कार्यालयाबाहेर येताच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब अन्य सहकाऱ्यांना समजताच त्यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले जात नसल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. या घटनेची संपूर्ण माहिती घेण्यात येत असून, अधिक चाैकशी सुरू असल्याचे कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस सह आयुक्त सत्यनारायण चाैधरी यांनी सांगितले.
अन्य कर्मचारीही त्रस्त?
वरिष्ठांच्या अशा वागणुकीने अन्य कर्मचारीही त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अन्य कर्मचाऱ्यांकडेही याबाबत वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.