महायुतीत बेबनाव नाही, कुणी नाराजही नाही, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये देणारच: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 05:34 IST2025-03-08T05:32:35+5:302025-03-08T05:34:23+5:30
काही जण टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात. पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

महायुतीत बेबनाव नाही, कुणी नाराजही नाही, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये देणारच: एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. अडीच वर्षात केलेली कामे पाहून विरोधकांना पुढील पाच वर्षांचा अंदाज आला आहे. त्यामुळेच महायुतीत बेबनाव आणि नाराजी असल्याच्या बातम्या पसरवत आहेत. मात्र, महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये देणारच. त्यासाठी आर्थिक आखणी सुरू आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महायुती सरकारने पाच वर्षांची दिशा ठरवलेली आहे. त्याच मार्गाने सरकार मार्गक्रमण करत आहे. मात्र, विरोधक दिशाहीन आणि गोंधळले आहेत. विरोधकांनी राजकारण न करता जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडावेत त्याला सरकारचे सहकार्य असेल, असे शिंदे म्हणाले.
टोला आणि शायरी
फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती.. अशी शायरी म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. काही जण टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात. पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, असेही ते म्हणाले.