लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात अद्याप चर्चा सुरू झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना शुक्रवारी दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या गोटात जागावाटपाची चर्चा कधी सुरू होणार याविषयी कोणतीही कल्पना नाही.
आम्हाला अद्याप भाजपकडून कोणताही निरोप नाही असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, महायुतीमध्ये भाजप ३० ते ३२ जागा लढवेल आणि उर्वरित १६ ते १८ जागांचे वाटप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केले जाईल. कमळ चिन्हावर लढण्याची शिवसेनेच्या काही खासदारांची इच्छा असल्याचे आणि तसा आग्रह त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला असल्याचे समजते. मात्र त्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
फॉर्म्युला काय असावा याबाबत केल्या सूचना nफडणवीस आणि शेलार यांनी पक्षश्रेष्ठींशी केलेल्या चर्चेत जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा याबाबत त्यांना काही सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच दिल्लीला जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील अशी शक्यता आहे.nमुंबईमध्ये सहापैकी चार जागा भाजपला तर दोन शिवसेनेला दिल्या जातील असे समजते. राष्ट्रवादीला (अजित पवार गट) मुंबईत जागा दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भात अजित पवार गटाला एक, शिवसेनेला तीन जागा दिल्या जाऊ शकतात.